माहुलची घरे कोणी घेईनात! ९ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:01 IST2025-04-07T17:42:14+5:302025-04-07T18:01:12+5:30
माहुल येतील स्वस्तातील घरांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून येथील ९,०९८ घरांसाठी केवळ दीडशे कामगारांनी अर्ज केले आहेत.

माहुलची घरे कोणी घेईनात! ९ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज, कारण काय?
माहुल येतील स्वस्तातील घरांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून येथील ९,०९८ घरांसाठी केवळ दीडशे कामगारांनी अर्ज केले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या या घरांच्या देखभालीसाठी वर्षाकाठी पालिकेला ७ कोटींचा खर्च येतो. ही घरे रिकामीच राहिली, तर त्याचा तोटा पालिकेलाच होणार आहे. त्यामुळे घर विक्रीसाठी आता पालिका प्रशासनाकडून कामगार संघटनांना साकडे घातले जात आहे.
पालिकेने पूर्व उपनगरात माहूल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यातील १३ हजारांपैकी ९,०९८ घरे पालिकेने तृतीय-चतुर्थ श्रेणी कामगारांना स्वस्तात विकत देण्याचे ठरवले. मात्र, या घरांसाठी कर्मचारी न आल्याने मालमत्ता विभागाने नुकतीच कामगार संघटनांची बैठक घेत कामगारांना संघटनांनी आवाहन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल
महापालिका या घरांच्या विक्रीबाबत कामगार संघटनांसोबत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल आहे. याशिवाय निवृत्त झालेले सफाई कर्मचारी जर ही घरे घेण्यास इच्छुक असतील, तर त्यांनाही घरे देण्याबद्दल विचार केला जाणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
कामगार संघटनांचे म्हणणे काय?
१. पालिकेची कामगार संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत उपायुक्त संजोग कबरे व सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. माहूल परिसरात खूप प्रदूषण आहे व या इमारतीतील घरांची दारे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असून तेथे स्वच्छता नसल्याची तक्रार कामगार संघटनेच्या नेत्यांनी केली.
२. मात्र माहूल गाव व परिसर प्रदूषणमुक्त असल्याचा अहवाल प्रदूषण नियामक मंडळाने दिला आहे, याकडे पालिकेने संघटनांचे लक्ष वेधले. माहूलमध्ये प्रशासनाने मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करुन द्यावात तसेच घरे व परिसर राहण्यायोग्य करुन दिला तर आम्ही कर्मचाऱ्यांना घरे घेण्याविषयी आवाहन करु, अशी भूमिका कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी घेतली.
३. तसेच या घरांमुळे कामगारांना मिळणारी सेवा निवासस्थाने व सफाई खात्यातील कामगारांच्या घराच्या योजनांमध्ये बाधा येणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशीही मागणी कामगार संघटनांनी केली. यावेळी कामगार संघटनांचे प्रतिनिधी अॅड.प्रकाश देवदास, नवनाथ महारनवर, उत्तम गाडे, दिवाकर दळवी, संजीवन पवार संजय कांबळे बापेरकर उपस्थित होते.