कुलगुरूंच्या अंतिम यादीत कोण येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:44 AM2018-04-13T05:44:50+5:302018-04-13T05:44:50+5:30
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदासाठी आलेल्या अर्जांपैकी एकूण ३३ जणांच्या मुलाखतींस शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदासाठी आलेल्या अर्जांपैकी एकूण ३३ जणांच्या मुलाखतींस शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. दोन दिवस चालण्याची शक्यता असणाऱ्या या मुलाखतींनंतर कुलगुरू निवडीसाठी स्थापन करण्यात आलेली शोध समिती पाच अंतिम नावे राज्यपालांकडे सादर करेल. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड करण्यात येईल.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या शोध समितीद्वारे या मुलाखती नरिमन पॉइंट येथील सिडको कार्यालयात घेण्यता येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे असल्याने तसेच अनेक बडे अधिकारी विदर्भातील असल्याने मुंबई विद्यापीठाला विदर्भाचाख् कुलगुरू मिळण्याच्या चर्चा मंत्रालय तसेच विद्यापीठाच्या वर्तुळात आहे.
कुलगुरूंचीनिवड करताना ती नॅकच्या मूल्यांकनाचा आढावा घेणारी व्यक्ती असावी, अशी मागणी मनविसेचे संतोष गांगुर्डे यांनी गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री आणि शोध समितीकडे निवेदनाद्वारे केल्याचे समजते. निवेदनात १४ मुद्दे मांडण्यात आले आहेत. दरम्यान, विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचे आव्हान नवीन कुलगुरूंवर असणार आहे. सध्या कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्यावर मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.