मुंबई : मुंबईत बेशिस्त दुचाकीस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात आता विनाहेल्मेट व ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्यादेखील वाढत चालली आहे. त्यामुळे आता या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आवरणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गतवर्षी सुमारे सहा लाख विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक विभागाने कारवाई केली होती तर जवळपास एक लाख ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती. तरीही नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची संख्या काही केल्या कमी होत नाही. रस्त्यात वाहतूक पोलीस दिसल्यास दुचाकीवर बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला खाली उतरवून, पुढे गेल्यावर पुन्हा त्या व्यक्तीला बसवून प्रवास केला जातो. यामुळे अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झाल्याचे प्रकारदेखील समोर आले आहेत. तरीदेखील ट्रिपल सीट प्रवास करण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येत नाही.
दुचाकी वाहनचालकांनो हे नियम पाळा
शहरात दुचाकी चालवताना दुचाकीस्वारांकडून अनेक नियम सहजासहजी मोडले जातात. मात्र काही साधे नियम हे स्वतःच्या व दुसऱ्याचा जीव सुरक्षित राहण्यासाठी पाळायलाच हवेत. जसे की चांगल्या दर्जाचे हेल्मेट वापरणे, विरुद्ध दिशेने गाडी न चालविणे, दुचाकीवर मागच्या सीटवर केवळ एका व्यक्तीलाच बसविणे, नियंत्रित वेगात गाडी चालविणे, रस्त्याच्या कडेला गाडी उभी न करणे हे साधे नियम पाळले तरीदेखील जीवितहानी होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.
तर ५०० चा दंड
ट्रिपल सीट - २००
गाडी चालवत फोन वापरणे - २००
नो पार्किंग - २००
फॅन्सी नंबरप्लेट - १०००
विनाहेल्मेट - ५००
असुरक्षित गाडी चालविणे - ५००