मराठी पट्टा कोणाला ‘फिट्ट’ बसणार, भाजप, शिंदेसेना की उद्धवसेनेला?
By रेश्मा शिवडेकर | Published: April 9, 2024 08:14 AM2024-04-09T08:14:57+5:302024-04-09T08:15:36+5:30
मराठी मते एकगठ्ठा उद्धवसेनेकडे जातात की मोदी आणि शिंदेसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या पारड्यात दान टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
रेश्मा शिवडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुजराती-मारवाडी आणि काही प्रमाणात उत्तर भारतीयांच्या मतांबाबत खात्री असल्याने उत्तर मुंबईतील भाजपचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा भर मागाठाणे, दहिसर, चोरकोप-गोराईतील मराठी पट्ट्यावर अधिक राहिला आहे. उत्तर मुंबईतील व्यापारी, मध्यमवर्गीयांनी कायम भाजपला साथ दिली आहे. परंतु इथली मराठी मते काय जादू करू शकतात, हे २००९ मध्ये संजय निरुपम विरूद्ध राम नाईक या लढतीने दाखवून दिले होते. मनसे-सेनेच्या झगड्यात मराठी मतांच्या विभागणीमुळे निरुपम जिंकून आले. अर्थात, त्यावेळेस मोदी नावाचे गारुड मराठी जनमानसावर नव्हते. आता परिस्थिती निश्चितपणे बदलली आहे. इथली अनेक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांची पसंती मोदींना आहे. त्यामुळे आता ही मराठी मते एकगठ्ठा उद्धवसेनेकडे जातात की मोदी आणि शिंदेसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या पारड्यात दान टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इथले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सुरुवातच मुळी दहिसर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून, शिवरायांची थोरवी गाऊन केली. त्यानंतर इथल्या हॉटेलात मराठी पदार्थांचा आस्वाद घेणे, गुढीपाडव्याला मला पुरणपोळी खायला बोलवणार ना, असे विचारत मराठी मतदारांना आवाहन करणे, यातून भाजपाची या मतदारसंघातील मराठी मतांची निकड लक्षात येते. त्यासाठी गृहनिर्माण, म्हाडा सोसायट्यांमध्ये बैठका, सभांवर जोर देत मराठी मतांची बेगमी करण्यात भाजप कार्यकर्ते गुंतले आहेत.
मराठी माणसाचे कोकणप्रेम लक्षात घेऊन यंदा मे महिन्यात गावी जाण्याचा कार्य़क्रम पुढे ढकला आणि २० मे रोजी मतदान अवश्य करा, असे आवाहन गोयल प्रत्येक सभेत करतात. गोयल यांनी नुकताच चारकोप, गोराईत गृहनिर्माण सोसायट्यांचा भव्य मेळावा घेतला. दुसऱ्या दिवशी मागाठाणे या आणखी एका मराठीबहुल विधानसभा मतदारसंघात गृहनिर्माण संस्थांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक यांच्या शाखेला भेट दिली. विशेष म्हणजे भाषणात केवळ केंद्रीय योजना, मोदी सरकारच्या कामगिरीवरच फोकस ठेवणाऱ्या गोयल यांनी या ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले.