Join us

मुस्लीम मतदारांचा कौल कुणाला मिळणार?

By admin | Published: January 31, 2017 3:04 AM

भाजपा, शिवसेना आणि मुस्लीम मानस यात असणारी मुस्लीम मतदानाची ही दरी कायमच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या पथ्यावर पडली. त्यामुळे मुस्लीम

- गौरीशंकर घाळे, मुंबई

भाजपा, शिवसेना आणि मुस्लीम मानस यात असणारी मुस्लीम मतदानाची ही दरी कायमच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या पथ्यावर पडली. त्यामुळे मुस्लीम मतदार म्हणजे या पक्षांसाठी व्होट बँक बनली. यंदा मात्र ओवेसी बंधूंच्या एमआयएममुळे मुस्लीम मतदारांसमोर नवा पर्याय उभा ठाकल्याने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मुस्लीम मतदारांचा कौल कुणाला मिळेल याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईत मुस्लीम समाजाचे सुमारे १६ टक्के मतदार आहेत. मावळत्या महापालिकेतील २२७ नगरसेवकांपैकी मुस्लीम नगरसेवकांची संख्या २३ आहे. यातील बहुतांश नगरसेवक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षातर्फे निवडून आले होते. शिवसेना आणि भाजपा उमेदवाराला रोखणे ही आतापर्यंतची या मतदारांची प्राथमिकता होती. त्याचा फायदा काँग्रेससह अन्य पक्षांना आपसूक मिळत गेला. यंदा मात्र मुस्लीम मतदारांसमोर एमआयएमच्या रूपाने सक्षम पर्याय उभा राहिल्याने आपला परंपरागत मतदार टिकविण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मोठी कसरत करावी लागत आहे. मुस्लीम समाजातील मुल्लामौलवी आणि प्रभावशाली व्यक्तींना आपल्याकडे खेचल्यावर संबंधित पक्षांना त्या त्या भागातील मुस्लीम मतदान होत असे. हा पायंडाच एमआयएममुळे उखडला जाण्याची भीती सध्या काँग्रेस आणि सपाला आहे. ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्यांचा कल काँग्रेसकडे, मध्यमवर्गीय सपाकडे आणि युवावर्ग एमआयएमकडे अशी सरमिसळ झाली असून एकाच घरात विविध पक्षांना पाठिंबा देणारी मंडळी असल्याचा नवाच ट्रेंड मुस्लीम मतदारांमध्ये सध्या दिसून येत आहे. त्यामुळे मुस्लीम मतदारांना राखण्यासाठी आतापर्यंतचे पारंपरिक फंडे आणि प्रचार अपुरा ठरत असल्याची जाणीव या पक्षांना झाली आहे. नव्या पर्यायाकडे झुकणारा आपला परंपरागत मतदार राखायचा तरी कसा, याची विवंचना काँग्रेस व सपाला लागली आहे. आपला हा मतदार राखण्यासाठी काँग्रेस व सपाने शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. एमआयएमला समाजातील वाढत्या पाठिंब्याने मतदानाचा ट्रेंड बदलून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयएमवर मुस्लीम मते विभाजित करण्याचा आरोप केला जात आहे. एमआयएमला मत म्हणजे शिवसेना, भाजपाला मत, असा प्रचार काँग्रेस व सपाकडून केला जात आहे. त्याला किती प्रतिसाद मिळतो, हे येणारा काळच ठरवेल. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी गोवंडी, मानखुर्द, अ‍ॅण्टॉप हिल, मालाड-मालवणी आदी भागांतील प्रचारदौरे वाढविले आहेत. तर एमआयएमने भायखळा, नागपाडा, भेंडीबाजार, कुर्ला, मालवणी आदी विभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भायखळा मतदारसंघातून एमआयएमचे वारीस पठाण विधानसभेवर निवडून गेल्याने येथे सपा आणि एमआयएममध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. या प्रभागात सध्या काँग्रेसचे फय्याज अहमद नगरसेवक आहेत. मात्र, आता हा प्रभाग ओबीसींसाठी राखीव झाल्याने येथून सपाचे महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनीही शड्डू ठोकला आहे. यावरून सपाने येथील निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे, याचे संकेत मिळत आहेत. आ. वारीस पठाण यांना शह देण्यासाठी सपाने एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमने गोवंडी येथील अबू आझमींच्या मतदारसंघातून सपाचे पदाधिकारी आपल्या गोटात आणले आहेत. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला प्रारंभ झाला आहे.ओवेसी बंधूंचा २८ जानेवारीपासून तळ काँग्रेस वा सपाप्रमाणे एमआयएमकडे निश्चित असे संघटन नाही. मात्र ओवेसी बंधूंचे जबर आकर्षण आहे. त्यातही धाकटे अकबरुद्दीन ओवेसी स्टार प्रचारक आहेत. २८ जानेवारीपासून महापालिका निवडणुका होईपर्यंत ते मुंबईत तळ ठोकून असणार आहेत. त्यांच्या भाषणांमुळे मुस्लीम समाज ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सपाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात सपाचे अबू आझमी काहीसे मवाळ आणि सर्वसमावेशक राजकारण करत असल्याचे दिसत होते. मात्र, ओवेसी बंधूंच्या राजकीय आव्हानामुळे आझमी आपल्या जुन्या शैलीकडे वळले आहेत. नागपाडा येथील त्यांच्या अलीकडच्या सभेत अत्यंत आक्रमकपणे त्यांनी मुस्लीम मतदारांना आवाहन केले.- मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख निझामुद्दीन राइन यांनी अलीकडेच एमआयएममध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचा संपूर्ण अल्पसंख्याक विभागच एमआयएममध्ये दाखल झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला नामुष्कीचा सामना करावा लागला. तसेच काँग्रेसच्या स्थायी समितीच्या सदस्या आणि चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या वकारुन्नीसा अन्सारी यांनीही एमआयएमची वाट धरली. त्यामुळे काँग्रेसमध्ये या नेत्यांना रोखायचे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे.प्रस्थापित पक्षांनी आतापर्यंत मुस्लीम समाजाची फसवणूकच केली आहे. बरोबरीचा विकास व्हायला हवा यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि तीच भूमिका आम्ही प्रचारात मांडत आहोत. मुस्लीम समाजाचा खासकरून तरुणाईचा आम्हाला पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत एमआयएम चांगले यश मिळवेल. - आमदार वारीस पठाण, एमआयएमएमआयएम म्हणजे मुस्लीम मतांची विभागणी आहे. भाजपाच्या इशाऱ्यावरून हा पक्ष काम करतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मागणाऱ्या ओवेसी बंधूंनी जिथे त्यांची सत्ता आहे त्या तेलंगणात मुस्लिमांसाठी किती निधी आणला, त्याचे उत्तर द्यावे. - आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष