नागपूर - विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होईल, असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. म्हणजेच, आता राज्यातील 'मतसंग्राम' महिन्यावर येऊन ठेपलाय, असं म्हणायला हरकत नाही. सगळेच राजकीय पक्ष, नेते या लढाईच्या जय्यत तयारीला लागलेत, पण त्यांच्यापेक्षा कसून काम करताहेत, ते सर्वच पक्षांमधले इच्छुक उमेदवार. अशावेळी, भाजपाच्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्या शिलेदारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक इशारा दिला आहे.
भाजपाचे कार्यकर्ते आता निवडणुकीच्या 'मोड'मध्ये आहेत. तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, भाजपमध्ये तिकीट वाटपासाठी कुठलाही 'कोटा' नाही. कामाचं मूल्यांकन होऊन तिकीट वाटप केलं जाईल, असं नितीन गडकरी यांनी नागपूरमधील विजय संकल्प मेळाव्यात स्पष्ट केलं.
...तरच नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकीट!
राजकारणातील घराणेशाही हा नेहमीचाच विषय आहे. बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना, नातवांना, सुनांना तिकीट मिळणं हे काही नवं नाही. त्यावरून नेहमीच होणाऱ्या टीकेबद्दल गडकरी म्हणाले की, नेत्यांच्या मुलांना किंवा पत्नीला भाजपामध्ये तिकीट दिलं जात नाही. मात्र, जनतेनेच जर तशी मागणी केली, तर नेत्याच्या कुटुंबीयांना तिकीट देण्याबाबत विचार होऊ शकतो.
युती होईल, सरकार येईल!
भाजपा आणि शिवसेनेत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला बाजूला ठेवून भाजपाने शिवसेनेपुढे कमी जागांचा प्रस्ताव ठेवला आहे आणि तो त्यांना फारसा मंजूर नाही. परंतु, ही निवडणूक भाजपा-शिवसेना एकत्रच लढतील आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त जागा भाजपाला मिळतील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
कानउघाडणी अन् सल्ला
लोकसभा, विधानसभा निवडणूक जिंकल्यावर काही जणांना अहंकाराचा वारा लागतो. आपण स्व-कर्तृत्वावर जिंकलो, असं काही खासदार, आमदारांना वाटू लागतं. परंतु, विजय हा कार्यकर्त्यांमुळेच मिळत असतो, हे कायम लक्षात ठेवा, असा उपदेश गडकरींनी केला. तसंच, पक्ष ज्याला कुणाला तिकीट देईल, त्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी भक्कम उभं राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.