Join us

या घरांना कोणी आसरा देणार का आसरा? सुमारे सव्वा लाख घरांची निर्मिती ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 10:00 AM

या तीनही शहरांमधील ५४५ प्रकल्पांतील सुमारे सव्वा लाख घरे अर्धवट बांधकाम अवस्थेत आहेत.

मुंबई : मुंबईसारख्या मायानगरीत स्वत:च्या हक्काचे घर असावे. नाही मुंबईत तर या महानगराला खेटून असलेल्या ठाणे-नवी मुंबई परिसरात तरी आपले घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण कर्ज काढून घर घेतात. मात्र, अनेकदा बांधकाम प्रकल्प रखडतात आणि घरांचे स्वप्नही लांबते. अशा रेंगाळलेल्या, रखडलेल्या घरांच्या प्रकल्पांबाबत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईने देशात आघाडी घेतली आहे. या तीनही शहरांमधील ५४५ प्रकल्पांतील सुमारे सव्वा लाख घरे अर्धवट बांधकाम अवस्थेत आहेत.

बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या कंपन्यांचे सर्वेक्षण करून प्रॉपइक्विटी यांनी देशभरात रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे. देशात एकूण दोन हजारांहून अधिक प्रकल्प रखडले असून त्यांद्वारे एकूण पाच लाख घरांची निर्मिती ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून हे प्रकल्प रखडले आहेत. 

देशात ग्रेटर नोएडा येथे १६७ प्रकल्प रखडले असून यातील घरांची संख्या ही ७४ हजार ६४५ इतकी विक्रमी आहे. हे प्रकल्प रखडण्यामागचे विश्लेषण करताना या सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की, विकासकांचे वित्तीय व्यवस्थापनाचे गणित चुकल्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकासकांची शक्ती अपुरी पडली आहे तर काही प्रकरणांत विकासकांनी प्रकल्पपूर्तीसाठी घेतलेले कर्ज हे जुने कर्ज फेडण्यासाठी किंवा नवीन भूखंड खरेदी करण्यासाठी वापरले आहे. त्याचा फटका या प्रकल्पांना बसला आहे.

टॅग्स :मुंबई