जो देगा ‘हजार’, उन्हीं का होगा प्रचार
By admin | Published: February 19, 2017 03:44 AM2017-02-19T03:44:38+5:302017-02-19T03:44:38+5:30
महापालिकेतील प्रचाराची धुळवड रविवारी सायंकाळी ५ वाजता शांत होईल. मात्र, कार्यकर्त्यांनीही त्यांचा फायदा उचलणाऱ्या नेत्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे
मुंबई : महापालिकेतील प्रचाराची धुळवड रविवारी सायंकाळी ५ वाजता शांत होईल. मात्र, कार्यकर्त्यांनीही त्यांचा फायदा उचलणाऱ्या नेत्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘जो देगा हजार, उन्हीं का होगा प्रचार’ असा ‘चढा’आवाज विविध वॉर्डांतून ऐकू येत आहे. परिणामी, शेवटच्या दिवशी आवाज कोणाचा... ‘कार्यकर्त्यांचा!’ असे म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.
गेल्या काही दिवसांतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी घोषणा देणारा, पत्रके वाटप करणारा, उमेदवारांच्या नावाची आरोळी देणारा, सभेची तयारी करणारा कार्यकर्ता आणि गर्दी जमवणारा अशा कार्यकर्त्यांचा समावेश असतो. प्रत्येक कामानुरूप ३०० ते ५०० रुपये आणि जेवणाची व्यवस्था संबंधिताकडून करण्यात येते, शिवाय रॅलीसाठी बाइकमध्ये १०० रुपयांचे पेट्रोल आणि ५०० ते १५०० रुपयांपर्यंत उमेदवार कार्यकर्त्यांसाठी मोजतो. यामुळे ‘हंगामी रोजगार’ म्हणून निवडणुकांकडे पाहण्याचा कल तरुणाईचा असल्याचे दिसून येते. प्रचारासाठी उमेदवारांचे नातेवाईकदेखील सहभागी होतात. मात्र, त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
मैदानी कार्यकर्त्यांप्रमाणे वॉर रूम आणि सोशल मीडिया सांभाळणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांचादेखील भाव वधारला आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस हा कार्यकर्त्यांना कमावण्यासाठी शेवटची संधी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा दिवसाला १ हजार रुपये आणि जेवण असा ‘भाव’ आहे.
स्थानिक मंडळ, इमारतींमधील मित्रमंडळींनी सुट्टीच्या दिवशी ‘पिकनिक’चा वायदा करून घेत, काही उमेदवारांच्या प्रचाराची गती वाढवली असल्याचे सांगितले आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि मतदान होईपर्यंत छुपा प्रचार, यासाठी उमेदवारांनीदेखील कार्यकर्त्यांच्या पर्यायी मतदारांच्या सुरात सूर मिसळल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
प्रचार खर्चात बसवण्यासाठी उमेदवारांची दमछाक
प्रचारासाठी उमेदवाराच्या खर्चावर निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिली आहे. परिणामी, उमेदवाराची त्या मर्यादेचे पालन करण्यासाठी दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी जीवलग आणि आर्थिक लागेबांधे असलेली मंंडळी उमेदवारांच्या मदतीला धावून येत असल्याचे चित्र आहे.
हंगामी रोजगाराचा अंतिम दिवस
उमेदवाराचा मैदानी प्रचारांपासून ते डिजिटल प्रचारापर्यंतचे काम कार्यकर्ता करत असतो. त्यामुळे निवडणुका म्हणजे हंगामी रोजगार अशी प्रथा तरुणाईमध्ये रूढ होत आहे. शिवाय महाविद्यालयीन तरुणांच्या पॉकेट मनीमध्ये वाढ झाल्याने निवडणुकीचा काळ म्हणजे सुगीचा काळ असल्याची चर्चा आहे. परिणामी, रविवार तरुणाईसाठी हंगामी रोजगाराचा अंतिम दिवस आहे.