Join us

मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार? ठाकरेंना भिडणारा हवा नवा भिडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:14 IST

मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असली, तरी २०१७च्या महापालिका निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते.

मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फडणवीस सरकारमध्ये सांस्कृतिक आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ असे भाजपचे धोरण आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना भिडणारा, तर शिंदेसेनेला वरचढ ठरणारा नवा भिडू असावा, यादृष्टीने भाजपने चाचपणी सुरू केल्याची माहिती खास सुत्रांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असली, तरी २०१७च्या महापालिका निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. मुंबई अध्यक्ष म्हणून शेलार यांनी सातत्याने महापालिका आणि ठाकरे यांच्यावर टीका करून आक्रमकपणा दाखविला. त्यामुळे पालिकेच्या जागा कायम राखण्यासोबतच अधिक जागा निवडून आणणे, ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणे आणि मित्रपक्ष शिंदेसेनेला वरचढ होऊ न देणे अशी आव्हाने नवीन अध्यक्षांसमोर असतील, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री कोण, यावर पुढील गणिते अवलंबूनमुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची यादी अद्याप जाहीर केली नाही. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुंबई शहराचे पालकमंत्री पद शिंदेसेनेकडे, तर उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपकडे होते. भाजपची शहरापेक्षा उपनगरांमध्ये  जास्त ताकद आहे. त्यामुळे भाजपकडे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आल्यास ते मंत्री आशिष शेलार यांना मिळाल्यास भाजपकडून नव्या चेहऱ्याचा विचार होऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले.

- यावेळी महापालिका निवडणूक जिंकून भाजपचाच महापौर बसविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आक्रमक चेहरा देण्यात येणार आहे. मुंबई अध्यक्ष पदासाठी अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अळवणी, संजय उपाध्याय या चार आमदारांसह विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर आणि माजी आ. सुनील राणे अशी नावे चर्चेत आहेत. यात आ. दरेकर बाजी मारतील, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :भाजपाशिवसेनाआशीष शेलार