Join us  

कोण मारणार बाजी? मतदात्या वाचकांचे कुतूहल शिगेला!

By admin | Published: April 08, 2017 7:36 AM

कोण ठरणार ‘युपीएल’ प्रायोजित लोकमत "महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराचे मानकरी, याच्या चर्चेला वेग आला आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात १४ क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण अनोखे योगदान देणाऱ्या ७२ व्यक्तिमत्त्वांमधून, मनोरंजन क्षेत्रातील नामांकनासाठी रंगभूमी व चित्रपटाच्या चार कॅटेगरींतून निवड झालेल्या २१ जणांतून कोण ठरणार ‘युपीएल’ प्रायोजित लोकमत "महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराचे मानकरी, याच्या चर्चेला वेग आला आहे.मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कारासाठी नामांकनात कलावंतांचा समावेश आहे. केशराचे शेत हे बिरूद अभिमानाने मिरविणाऱ्या मराठी रंगभूमीला अधिक समृद्ध करताना, महाराष्ट्रातील रुपेरी पडद्याला नवी उंची देत मनोरंजन क्षेत्रात यशाचे नवनवे मापदंड सिद्ध करणाऱ्या या व्यक्तींच्या नामांकनाने एकापरीने या क्षेत्राचाच गौरव झाला आहे. विक्रमादित्य रंगकर्मी प्रशांत दामलेपासून दिग्दर्शक फिरोज अब्बास खानपर्यंत आणि सुकन्या कुलकर्णी, शुभांगी गोखले यांच्यापासून स्पृहा जोशीपर्यंतच्या नामांकनांमुळे पुरस्कारात बाजी कोण मारणार हा सवाल लाखमोलाचा बनला आहे. शिवाय चुरसही वाढली आहे. या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाचा अल्पसा परिचयही कलाक्षेत्राचे क्षितिज विस्तारण्यातील त्यांच्या योगदानाची साक्ष देणारा आहे. मराठी चित्रपट व्यवसायाला आलेली मरगळ दूर करण्याला हातभार लावलेल्या अभिनेते तसेच अभिनेत्रींचा हा अप्रत्यक्ष गौरव आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर छाप सोडणाऱ्या ‘व्हेंटिलेटर’मधील आशुतोष गोवारीकर सारख्या ख्यातकीर्त नट-दिग्दर्शकापासून सैराटमधील ताज्या दमाच्या नवख्या आकाश ठोसरपर्यंत आणि ‘वजनदार’मधील सई ताम्हणकरपासून ‘सैराट’मधील रिंकू राजगुरुपर्यंतची नामांकनांनी लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या चर्चेत भर पडली आहे. लोकमत"महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे.---------------------------------------- सन्मान संध्या रंगणार ‘सहारा स्टार’मध्ये ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चे पुरस्कार प्रदान करण्याची सन्मान संध्या मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये रंगणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी असलेला हा सोहळा मंगळवार ११ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल. लोकमताचा उदंड प्रतिसाद नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत.