मुंबईतील मतदानाची आकडेमोड कुणाची झोप उडवणार? उमेदवारांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा
By संतोष आंधळे | Published: November 22, 2024 11:30 AM2024-11-22T11:30:45+5:302024-11-22T11:32:18+5:30
संतोष आंधळे, मुंबई Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास ...
संतोष आंधळे, मुंबई
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास सुरू केला. कोणत्या बूथवर कुणाला किती मतदान झाले असेल, याचे आडाखे बांधले जात होते. तर, उत्साही कार्यकर्ते उमेदवारांकडे आपणच कसे जिंकून येणार आहोत, याचे सखोल विश्लेषण मांडत होते.
अनेकांचा गुरुवारी कुटुंबीय, मित्रांसह वेळ घालविण्याचा मनोदय होता. मात्र, त्यांची सकाळ कार्यकर्त्यांच्या भेटीने सुरू झाली.
बंद दाराआड चर्चा
सर्वच प्रमुख पक्षांतील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी असलेली माहिती घेऊन बैठकीस सुरुवात केली. काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित बंद दाराआड चर्चा होत होती. बूथनिहाय मतदानाच्या टक्केवारीची चिरफाड केली जात होती. प्रत्येक कार्यकर्ता आपले मत व्यक्त करत होता.
येऊन येऊन येणार कोण?
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आपणच कसे निवडून येत आहोत, यावर ऊहापोह करण्यात आला. काही पदाधिकारी तावातावाने आवाज चढवत येऊन येऊ येणार कोण? अशी घोषणा देत होते. सर्वच कार्यकर्ते उमेदवारांचे नाव घेऊन सायंकाळची बैठक कुठे आणि कशी घेता येईल याचे नियोजन करताना दिसून होते.
विरोधकांच्या परिसरात किती मते?
या संपूर्ण प्रक्रियेत विरोधी उमेदवाराच्या परिसरात कशा पद्धतीने मतदान झाले आहेत, याची आकडेवारी काढली जात होती. तेथे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांकडून जोरदार मेहनत घेतली जात होती, या गोष्टीवर प्रदीर्घ चर्चा रंगताना दिसत होती.
दुसरीकडे चांगले काम केलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात होते. प्रत्येक गटात आपली काही माणसे काम करत होती, त्यासाठी केलेले नियोजन कसे यशस्वी झाले आहे, यावर ते व्यक्त होत होते.
सोशल मीडियाची कमाल
सोशल मीडियासाठी नियुक्त केलेल्या टीमनेही प्रचाराचा टेम्पो शेवटपर्यंत कायम ठेवला होता. काही कल्पक पोस्ट तयार करण्यात आल्या होत्या, त्यावर सुद्धा विचार मंथन या बैठकीत करण्यात आले.
काहींनी या सोशल मीडिया टीमला कायमस्वरूपी कामासाठी निमंत्रण दिले. त्यांनी यापुढे ऑफिसमध्ये बसून कसे काम करावे, याबाबत सूचना दिल्या जात होत्या.