Join us

राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकणार? आयोगास सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 6:19 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. हा प्रचार कोणासाठी आहे आणि या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवणार हे स्पष्ट करण्याची मागणी प्रदेश भाजपने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांच्याकडे केली आहे.भाजपच्या महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात एक पत्र शनिवारी अश्वनीकुमार यांना दिले. राज ठाकरे सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या, शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. हा प्रचार प्रत्यक्षपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे. या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखविला पाहिजे ही बाब स्पष्ट होत नाही, असे तावडे यांनी पत्रात म्हटले आहे.या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नाव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. परंतु राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णत: राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे आमचे असे मत आहे की, त्या ठिकाणच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचे स्पष्टीकरण घ्यावे, अशी मागणीही तावडे यांनी केली आहे.काँग्रेसची उपरोधिक टीकामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सत्याचा प्रचार केला जात असल्याने मोदी आणि शहा या जोडीचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडत चालला आहे. यामुळे जनमत दूर चालल्याने, हतबलतेमधून भाजपकडून राज ठाकरेंच्या सभेवर होणाऱ्या खर्चावर आक्षेप घेतला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आपला काहीही संबंध नाही, हे राज ठाकरे यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे.भाजपचा घसरलेला पाय सावरण्याकरिता भाजपमधूनही मोदी-शहा यांच्या विचारांची मुक्ती होणे आवश्यक आहे. राज ठाकरेंमुळे देशहिताबरोबरच भाजपचे हित जोपासले जात असल्याने राज ठाकरेंच्या सभांचा खर्च भाजपने आपल्या नावावर उचलला तरी काय हरकत आहे, अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.>माजी आयुक्त काय म्हणतात?प्रचारसभांचा खर्च पक्ष करत असतात. राज ठाकरेंची सभा कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी नसेल तर त्यात निवडणूक आयोगाला काहीही हस्तक्षेप करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ज्या राजकीय धोरणांसाठी सभा घेतली जाईल त्या धोरणांशी संबंधित इतर पक्ष आपसात समझोता करून हा खर्च वाटूनदेखील घेऊ शकतात. निवडणुकीत न उतरलेली व्यक्ती, पक्ष स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सभा घेऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019