वर्सोव्याची जागा कोणाला सुटणार? महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
By मनोहर कुंभेजकर | Published: October 24, 2024 03:47 PM2024-10-24T15:47:27+5:302024-10-24T15:47:30+5:30
Maharashtra Assembly Election 2024: वर्सोवा मतदार संघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. ही जागा उद्धव सेनेला का काँग्रेसला सुटणार याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - वर्सोवा मतदार संघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. ही जागा उद्धव सेनेला का काँग्रेसला सुटणार याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री वर्सोव्यातील इच्छुक उमेदवार उपनेत्या राजुल पटेल,माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे,माजी विरोधी पक्षनेते
बाळा आंबेरकर,उपविभागप्रमुख राजू पेडणेकर व उपविभागप्रमुख हरून खान यांना मातोश्रीवर बोलवले होते. वर्सोव्याची जागा आपल्याला सुटण्यासाठी महाविकास आघाडीची बोलणी सुरू आहे.मात्र अद्याप निर्णय झालेला नाही असे ठाकरे यांनी सांगितल्याची महिती सूत्रांनी दिली.
तर ही जागा कॉंग्रसला सुटण्यासाठी कॉंग्रेसचे तब्बल २१ इच्छुक प्रयत्नशील असून अनेकांच्या तिकीट मिळण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत.माजी मंत्री सुरेश शेट्टी,माजी पोलीस आयुक्त संजय पांडे,अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव महेश मलिक,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस भावना जैन,माजी आमदार बलदेव खोसा,माजी आमदार कपिल पाटील,माजी नगरसेवक चंगेज मुलतानी, युवक काँग्रेसचे अखिलेश यादव, अवनिश सिंग, मोनिका जगताप यांची नावे चर्चेत आहे.
या मतदार संघात सुमारे १,१०००० अल्पसंख्याक मतदार आहे.तसेच लोकसभा निवडणुकीत वर्सोव्यात उमेदवार अमोल कीर्तिकर यांना सुमारे २१ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.त्यामुळे हा मतदार संघ उद्धव सेना आणि काँग्रेसला सुद्धा हवा आहे.दि,२२ पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरवात झाली असल्याने वर्सोव्याचा तिढा कधी सुटणार आणि कधी प्रचार सुरू करणार याकडे महाविकास आघाडीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.