Join us

’त्या’ तरुणाचा सांभाळ करणार कोण ?

By admin | Published: July 26, 2015 2:41 AM

गतिमंद मुलगा जन्माला आला म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांनी साथ सोडली. आईच्या मायेच्या छत्राखाली तो मोठा झाला. मात्र आता हे छत्रच हरपल्याने त्याचा सांभाळ

मुंबई : गतिमंद मुलगा जन्माला आला म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांनी साथ सोडली. आईच्या मायेच्या छत्राखाली तो मोठा झाला. मात्र आता हे छत्रच हरपल्याने त्याचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न मुलुंडच्या २६ वर्षीय विशाल नागवेकरच्या बाबतीत उभा ठाकला आहे.२० वर्षापूर्वी वडिलांनी आईसोबत घटस्फोट घेतल्यानंतर विशाल ६५ वर्षीय विनोदिनी नागवेकरांसोबत राहण्यास होता. मंगळवारी रात्री विनोदिनी यांनी विशालशी गप्पा मारून त्याला झोपवले आणि स्वत:ही त्यांच्या खोलीत जाऊन झोपी गेल्या त्या उठल्याच नाहीत. हृदयविकाराचा झटका येऊन झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. अशात तब्बल तीन दिवस आईच्या मृतदेहाशेजारी ती जागी होण्याची वाट पाहत असलेल्या विशालच्या पदरी अखेर निराशाच पडली. शुक्रवारी दूध विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस येताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत विशालला अग्रवाल रुग्णालयात दाखल केले.विशालला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सध्या तो त्याच्या मावशीकडे आहे. याबाबत त्याच्या वडिलांनाही कळविण्यात आले आहे. विशालचा सांभाळ कोण करणार याबाबत त्यांच्या नातेवाइकांची बैठक होणार आहे. त्या बैठकीतून त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.