Join us  

 नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत कोण मारणार बाजी? १९ ऑक्टोबरला अंतिम फेरीत पाच एकांकिकांमध्ये होणार चुरशीची लढत

By संजय घावरे | Published: October 16, 2023 7:55 PM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ‘शाखांतर्गत एकांकिका स्पर्धा' मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ‘शाखांतर्गत एकांकिका स्पर्धा' मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. अंतिम फेरीतील पाच एकांकिकांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. स्पर्धेची अंतिम फेरी रसिकांना विनामूल्य पाहता येईल. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलामध्ये गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २ ऑक्टोबरला अमरावती, ८ ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूर तसेच १० ऑक्टोबरला मुंबई या केंद्रांवर संपन्न झाली.  

यात अमरावती, अकोला, नागपूर, नागपूर उपनगर-१, कारंजा लाड, पिंपरी-चिंचवड, कोथरुड, पुणे, अहमदनगर, शिरुर, कोल्हापूर, सांगली, सातारा, इस्लामपूर, इचलकरंजी, बीड, सोलापूर, सोलापूर उपनगर-१, मंगळवेढा, बीड, नाशिक, बोरिवली, मुलुंड, कल्याण आणि मध्यवर्ती शाखेने सहभाग घेतला होता. प्रत्येक केंद्रातून अंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट एकांकिका निवडण्यात आली आहे. यात अमरावतीची ‘मधुमोह’, अहमदनगरची ‘जाहला सोहळा अनुपम', सोलापूरची ‘जन्म जन्मांतर’, इचलकरंजीची ‘हा वास कुठून येतोय’, तर नाशिक शाखेची ‘अ डील’ या एकांकिका अंतिम फेरीत सादर  होणार आहेत. यावेळी रसिकांसह नाट्य परिषदेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले व स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :मुंबई