लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे वेळ सांगेल. इतरांनी हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांचे नाव न घेता ‘प्रहार’ केला. हा जनआशीर्वाद नाही, तर जन छळवणूक आहे, अशी टीकादेखील महापौरांनी केली.
नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, कोणतीच निवडणूक सोपी आहे असे आम्ही कधीच म्हटले नाही. कारण दर निवडणुकीला इतिहास आणि भुगोल वेगळा असतो. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचा फोकस ठरला आहे. कोणावर टीका करण्यापूर्वी आपण आपला प्रवास बघितला पाहिजे. आपल्याला अशी टीका करण्याचा अधिकार कोणी दिला? याचा विचार केला पाहिजे.
नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ दाखल होत दर्शनही घेतले. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, बाळासाहेब आमचे ऊर्जास्थान आहे. शक्तिस्थान आहे. आमच्या घरी येऊन जर का कोणी नतमस्तक होत असेल तर आम्ही आमच्या संस्कृतीप्रमाणे वागणार. बाळासाहेबांनी शिकवले आहे की घरात आलेल्याला हाकलवयाचे नसते. उशिरा का होईना देहरूपी नसले तरी हे सगळे विचारात भिणले आहे हे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. कोणी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असेल तर आम्हाला आनंद आहे. यात राजकारण करण्याची गरज नाही.
मुळात आपण जनतेला गृहित धरू नये. आज आपण एका वेगळ्या टप्प्यातून जात आहोत. कोरोनासारखा काळ आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. हे मी म्हणत नाही. आरोग्यतज्ज्ञ म्हणत आहेत. आपण ऐकले पाहिजे.