मुंबई - कांदिवलीतील ग्रोवेल माॅलमध्ये एरव्ही खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. मात्र शनिवारी बायसेप्स, ट्रायसेप्स, सिक्स पॅक्स, शोल्डर, काल्फ, थाइज, अॅब्स, बॅक मसल्सचा अनोखा नजराणा अनुभवता अाला. निमित्त होते ते युवा सेना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्था आयोजित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबईकरांना अापल्या शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती पाहण्याचे भाग्य लाभले. नऊ गटांमध्ये झालेल्या चाचणीत मुंबईतील एकापेक्षा सरस शरीरसौष्ठवपटू मंचावर अवतरल्यामुळे कुणाची अंतिम फेरीसाठी निवड करायची, असा पेचप्रसंग परीक्षकांना पडला होता. अाता कांदिवली पूर्वेला ठाकूर संकुलातील सेंट लॉरेन्स शाळेच्या पटांगणात रंगणाऱ्या अंतिम फेरीत मुंबई श्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या अाहेत.
गेले चार महिने मुंबईचे युवा शरीरसौष्ठवपटू मुंबई श्री स्पर्धेच्या किताबासाठी तासनतास घाम गाळत असल्यामुळे प्राथमिक फेरीत पीळदार शरीरयष्टीचे द्वंद्व पाहायला मिळाले. १५४ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभल्यामुळे प्राथमिक फेरीत प्रत्येक गटात चुरस पाहायला मिळाली. तब्बल ५४ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात अाल्यामुळे मुंबईकरांना रविवारी थरारक खेळाची अनुभूती घेता येईल. ५५ किलो वजनी गटात संदेश सकपाळ, नितीन शिगवण, किशोर कदम, वैभव गुरव अाणि राजेश तारवे यांच्यात गटविजेतेपदासाठी कडवी लढत रंगेल. ६० किलाे गटातून तुषार गुजर, अाकाश बाणे, बप्पन दास, उमेश गुप्ता, विनायक गोळे अाणि तेजस भालेकर हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले अाहेत. ६५ किलो वजनी गटात प्रतीक पांचाळ, अादित्य झगडे, तेजस धामणे, उमेश पांचाळ, प्रदीप झोरे अाणि जगदीश कदम हे गटविजेतेपदासाठी अामनेसामने असतील.
७० किलो वजनी गटातून सुजित महापात्रा, विशाल धावडे, चिंतन दादरकर, विग्नेश पंडित, अब्दुल कादर यांच्यात चकमक उडालेली पाहायला मिळेल. रोहन गुरव, महेश शेट्टी, समीर भिलारे, अमोल गायकवाड, सुशील मुरकर अाणि सौरभ साळुंखे यांच्यात ७५ किलो वजनी गटात कडवा संघर्ष अपेक्षित आहे. मुंबई श्री किताबाचा मानकरी हा वरच्या गटातील असल्यामुळे अापल्या उत्तम शरीरसंपदेसह सुयश पाटील, सुधीर लोखंडे, रोहन कांदळगावकर, सुशांत रांजणकर, पवन सोगई आणि आशिष मिश्रा यांच्यासारखे अव्वल बाॅडीबिल्डर्स ८०किलो वजनी गटात अव्वल स्थान घेण्यासाठी झटतील. किताबासाठी जणू युद्धच रंगणार अाहे. ८० किलो वजनी गटात सुयश पाटील,सुशांत रांजणकर, सुशील मुरकर अाणि रोहन तांदळगावकर यांच्यात जेतेपदासाठी खरी चुरस असेल. ८५ किलो वजनी गटातून सुजन पिळणकर, प्रशांत परब, स्वप्नील मांडवकर, रसल दिब्रिटो, अभिषेक खेडेकर अाणि अनिकेत पाटील हे यांच्यात मुकाबला रंगणार अाहे. ९० किलो वजनी गटात दीपक तांबिटकर, सचिन कुंभार, आतिष जाधव,शैलेश शेळके अाणि सकिंदर सिंग हे आपले सर्वस्व पणाला लावतील. ९० किलोवरील गटात महेश राणे,श्रीदीप गावडे आणि नितीन रुपारेल यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
प्रतिष्ठेच्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेला यंदाही शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे बळ लाभले असून यावर्षीही शरीरसौष्ठव आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम आयोजक क्रीडाप्रेमी सिद्धेश रामदास कदम यांनी चोखपणे बजावले आहे. मुंबई श्री किताब विजेत्याला दीड लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार अाहे. उपविजेता ७५ हजार रुपयांचा तर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ३७.५ हजारांचा मानकरी ठरेल. गटातील अव्वल सहा खेळाडूंवरही रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार अाहे. पहिल्या सहा विजेत्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार, ८ हजार, ६ हजार अाणि ५ हजार अशा रकमेचे बक्षिस देण्यात येईल. इतकेच नव्हे तर सर्वोत्कृष्ट पोझर अाणि सर्वोत्तम प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूला प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सुनीत जाधव, सागर कातुर्डेचा खेळ पाहण्याची संधी
मुंबई श्री स्पर्धेनंतर लगेचच पुढच्या रविवारी महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार अाहे. महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबईचा संघ निवडण्याकरिता मुंबईतील सुनीत जाधव,सागर कातुर्डे, रोहित शेट्टी, सचिन डोंगरे, अतुल अांब्रे अाणि रोहन धुरी हे दिग्गज क्रिकेटपटू अापल्या अाखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार अाहेत. मात्र अांतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई श्री स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत नसले तरी त्यांचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार अाहे.