लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटात कोण आणि शरद पवार गटात कोण याचे चित्र विधानसभेत स्पष्ट होईल असे वाटत असतानाच पक्षाचे अनेक आमदार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित असल्याने याबाबतचा संभ्रम कायम राहिला.
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी व शरद पवार गटाकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असून अनेक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. दोन्ही गटाकडून शह-काटशहचे राजकारण सुरू झाले होते. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री पदाची शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांना वगळून उर्वरित सर्व आमदारांची विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती. अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच पहिल्याच दिवशी अनेक आमदारांनी सभागृहात येणे टाळले. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार होते, याबाबत पहिल्या दिवशी संभ्रम कायम राहिला. दरम्यान, अजित पवार गटाचे असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे मात्र विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेत्यांच्या बाजूच्या जागेवर बसले होते.
विरोधी बाकावर शरद पवार समर्थक ८ आमदार : जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, सुमन पाटील, रोहित पवार, मानसिंग नाईक
सत्तारूढ बाकांवर अजित पवार गट९ मंत्र्यांसह ६ आमदार :बबनदादा शिंदे, इंद्रनील नाईक, प्रकाश सोळंके, किरण लहमाटे, सुनील शेळके, सरोज अहिरे
विधान परिषदेतही राष्ट्रवादी आमदारांत फूट
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी सत्ताधारी पक्षात बसण्याची विनंती उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अरुण लाड हे विरोधी बाकावर तर रामराजे निंबाळकर, विक्रम काळे, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण हे सत्ताधारी बाकावर बसले. त्याचप्रमाणे ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे याही सत्ताधारी बाकावर बसल्या. एकनाथ खडसे, बाबा जानी दुर्राणी हे आमदार उपस्थित नव्हते.
तालिका सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज तालिका सदस्यांची नियुक्ती केली. आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नरेंद्र दराडे आणि राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. शोकप्रस्ताव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडले. माजी विधान परिषद सदस्य डॉ. माणिकराव मंगुडकर आणि प्रभाकर दलाल यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आले.