लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांच्या काही पोलिस वसाहतींची दुरवस्था झाली आहे. त्यात, पावसाळ्यात पडझडीच्या घटनांमुळे अनेक कुटुंबीय जीव मुठीत धरून राहत आहेत. गेल्या महिन्यात घराचे छत कोसळून पोलिस कुटुंबीय जखमी झाल्याची घटना घडली. अशा पडझडीच्या घटना सुरूच असल्यामुळे साहेब, लेकरांना घेऊन अशा ठिकाणी कसे राहायचे, असा सवाल पोलिस कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबईतील वरळी, नायगाव आणि मरोळ या मोठ्या पोलिस वसाहतींसह शहरात एकूण ४६ पोलिस वसाहती आहेत. यात हजारो पोलिस कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी घरातील मंडळींचा विचार न करता हे खाकीतील योद्धे कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उतरून आपली कामगिरी बजावली आहे आणि आजही कर्तव्य बजावण्यासाठी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी सुखरूप पोहचेल की नाही, ही भीती पोलिस वसाहतींमध्ये कायम आहे.
दुसरीकडे, याच खाकीतील योद्ध्यांना घरासाठी वारंवार झगडावे लागत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. आजही काही वसाहतींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू झाले तर काही ठिकाणी अजूनही काही घरांची दुरवस्था कायम आहे.
दरम्यान, सरकारने तातडीने या इमारतींची दुरुस्ती करावी अशी मागणी या पोलिस कुटुंबांकडून होत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल केला जात आहे.
ते कुटुंब थोडक्यात बचावले
- ताडदेव पोलिस वसाहतीत राहणारे ज्ञानदेव लक्ष्मण सानप (५७) यांच्या घरात ही घटना घडली आहे.
- ते मलबार हिल पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
- ६ मार्च रोजी घराच्या हॉलमधील स्लॅब कोसळल्याने खळबळ उडाली.
- यामध्ये, सानप यांच्यासह पत्नी, मुलगा आणि मुलगी जखमी झाले होते.
४६ वसाहती
मुंबई पोलिस दलात जवळपास ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तर, मुंबईत एकूण ४६ पोलिस वसाहती आहेत.
अशाही अडचणी
दुरुस्तीसाठी अनेकदा संबंधित बांधकाम अधिकाऱ्याकडे सततचा पाठपुरावा करूनही ते दुर्लक्ष करतात.