"जो अयोध्येत राममंदिर बांधेल, तोच यापुढे करेल राज्य"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:28 AM2018-12-03T04:28:16+5:302018-12-03T04:28:47+5:30
जो अयोध्येत राम मंदिर बांधून देईल, त्यालाच राम भक्तांनी निवडून द्यावे आणि जे राम मंदिर बांधण्यास पुढे येतील, तेच यापुढे राज्य करतील, असा इशारा स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी रविवारी दिला.
मुंबई : जो अयोध्येत राम मंदिर बांधून देईल, त्यालाच राम भक्तांनी निवडून द्यावे आणि जे राम मंदिर बांधण्यास पुढे येतील, तेच यापुढे राज्य करतील, असा इशारा स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी रविवारी दिला.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदा करावा आणि अध्यादेश काढून मंदिर बांधावे, या मागणीसाठी एमएमआरडीए मैदानावर विश्व हिंदू परिषदेने भरवलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती.
राम मंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सरकारला हिंदुत्वाची वज्रमुठ काय करू शकते, याची जाणीव करून दिली, तरच त्यांचे डोळे उघडतील. इतर देश जर धर्मासाठी लढत असतील, तर हिंदूंनीच हाती बांगड्या भरल्या आहेत का? सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनाच का शिकवता? असे प्रश्नही त्यांनी विचारले. आदिवासींना हिंदू धमार्तून तोडण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारतात जेवढे मुस्लिम सुरक्षित आहेत. तेवढे दुसऱ्या देशात नाहीत, असा दावा करून नयनपद्म सागरजी महाराजांनी जो मंदिर बनवेल, तोच निवडणूक जिंकेल, असे जाहीर केले. जैन हेही हिंदू आहेत आणि राम मंदिरासाठी तेही पुढे येतील. धर्मपरिवर्तनापासून वेगवेगळे अत्याचार आजवर हिंदूंवरच झाल्याचा दावाही त्यांनी केला.
देशात विकासासोबतच मंदिरही आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोविंदगिरी महाराजांनी केला. राम जन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे, असा दावा त्यांनी केला.
सरकारचे कामकाज केवळ राम भक्तांमुळेच सुरू आहे आणि मंदिरात जर रामाला बसविले, तर सरकार ५० वर्षे राज्य करेल, असे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी महाराजांनी सांगितले. बाबराने राम मंदिर उद्ध्वस्त केल्यापासून हा संघर्ष सुरु असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.