ज्याच्या नावावर वाहन असेल तोच नुकसानभरपाई देईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:58 AM2019-11-27T06:58:31+5:302019-11-27T06:58:52+5:30
वाहन विकूनही त्या वाहनाचा मालक म्हणून जुन्या मालकाची नावाची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) असेल आणि त्या वाहनाचा अपघात झाला तर अपघात झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी जुन्या मालकाचीच असेल
मुंबई : वाहन विकूनही त्या वाहनाचा मालक म्हणून जुन्या मालकाची नावाची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) असेल आणि त्या वाहनाचा अपघात झाला तर अपघात झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी जुन्या मालकाचीच असेल, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
मोटार अपघात दावा लवादाने हुफरीज सोनावाला यांना पीडितेला १ लाख ३४ हजार रुपये ७.४ टक्के व्याजाने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या आदेशाला सोनावाला यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
सोनावाला यांच्या म्हणण्याानुसार, त्यांनी संबंधित वाहन कल्पेश पांचाल यांना विकले व त्याचा ताबा पांचाल यांच्याकडे आहे. मार्च २००८ मध्ये पांचाल यांनी भारत देव या व्यक्तीच्या कारला धडक दिली. त्यात पांचालही जखमी झाले. दोन आठवडे ते रुग्णालयातच होते. त्यानंतर दवे यांनी पांचालविरोधात लवादाकडे दाद मागितली. ११ जून २०११ रोजी लवादाने संबंधित वाहनाचे मालक सोनावाला यांना दवे यांना १ लाख ३४ हजार रुपये ७.४ टक्के व्याजाने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या निर्णयाला सोनावाला यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
‘याचिकाकर्त्याने २००८ मध्येच पांचाल यांना वाहन विकले असून वाहनाची नोंदणी त्यांच्या नावावर करावी, यासाठी सोनावाला यांनी सर्व कागदपत्रे पांचाल यांना दिली. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम देण्याकरिता याचिकाकर्ते जबाबदार नाहीत,’ असा युक्तिवाद सोनावाला यांचे वकील रवी तलरेजा यांनी न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठापुढे केला.
त्यावर देव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. ‘२९ डिसेंबर २००८ रोजी संबंधित वाहन दवे यांच्या नावे केले. याचाच अर्थ, अपघाताच्या दिवशी वाहन याचिकाकर्त्यांच्या नावे होते. मोटार वाहन अधिनियम ५० अंतर्गत सोनावाला यांनी मुदतीत वाहन दवे यांच्या नावे करणे बंधनकारक होते,’ असा युक्तिवाद दवे यांच्या वकील कृतिका पोकळे यांनी केला.
निर्णय देताना न्या. धानुका यांनी सर्वोच्च न्यायालयाने नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार या केसचा आधार घेत म्हटले की, १४ दिवसांत वाहन नव्या मालकाच्या (जुने वाहन विकत घेणारी व्यक्ती) नावे करणे हे जुन्या मालकासाठी बंधनकारक आहे.
‘लवादाच्या निर्णयात हस्तक्षेपाची गरज नाही’
‘सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो या केसमध्ये लागू होतो. १४ दिवसांत याचिकाकर्त्याने वाहन नव्या मालकाच्या नावे करायला हवे होते. मात्र, याचिकाकर्ते तसे करण्यात अपयशी ठरले. संबंधित वाहन याचिकाकर्त्यांच्या नावावर असतानाच अपघात झाला. त्यामुळे कायद्याने दवे यांना नुकसानभरपाई देण्यास याचिकाकर्ते जबाबदार आहेत. त्यामुळे लवादाने दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही,’ असे न्या. धानुका यांनी स्पष्ट केले.