Join us

‘जो गरजते है, वो कभी बरसते नही!’,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 10:17 PM

शिवसेनेने स्वाभिमान गमावला आहे. ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. ‘जो गरजते वो कभी बरसते नही’ हे शिवसेनेने ‘करून दाखवलं’. असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे.

मुंबई - शिवसेनेने स्वाभिमान गमावला आहे. ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. ‘जो गरजते वो कभी बरसते नही’ हे शिवसेनेने ‘करून दाखवलं’. असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे.

सरकारबाहेर पडण्यासंदर्भात शिवसेनेने अलिकडेच सूचक विधाने केली होती. परंतु, दसरा मेळाव्यात त्याबाबत  मौन बाळगल्याने विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, शिवसेना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी सरकारबाहेर पडण्यासंदर्भात आजवर जेवढ्या घोषणा केल्या, त्याला ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ एवढीच उपमा देता येईल.

सध्या महाराष्ट्रात दोनच लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहेत. एक म्हणजे झी टीव्हीचा ‘चला हवा येऊ द्या’आणि दुसरा म्हणजे मातोश्री प्रोडक्शनचा ‘चला सत्ता सोडूया’. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला यापुढे फक्त विनोदानेच घेतले पाहिजे. त्यांच्या विधानांकडे गांभिर्याने बघण्याची गरज नाही, असे विखे पाटील पुढे म्हणाले.

मनोरंजन, करमणूक आणि विनोदी कार्यक्रमांच्या टीआरपीमध्ये उद्धव ठाकरे नक्कीच पहिल्या क्रमांकावर असतील. सरकार म्हणून महाराष्ट्राची विनोदबुद्धी जागृत ठेवणे, हे शिवसेनेचे एकमेव योगदान आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.

चिखलात कमळ नव्हे तर फक्त मळ दिसतोय, असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण तसे असेल तर मग त्याच मळाने स्वतःचे तोंड का काळे करून घेताय? अशी विचारणाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.