लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास घडावा, हे सर्वसामान्यांचे स्वप्न; पण संसाराच्या रहाटगाडग्यात प्रत्येकाला ते शक्य होतेच असे नाही. अशात श्वानाने हवाई सफर केल्याचे कानावर पडले तर? होय, एका श्वानाने नुकताच मुंबई-चेन्नई विमान प्रवास केला. विशेष म्हणजे या अनोख्या प्रवासासाठी त्याच्या मालकाने बिझनेस क्लासची पूर्ण केबिन बुक केली होती.
एक महिला बुधवारी सकाळी श्वानासह मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २वर दाखल झाली. ती एअर इंडियाच्या ‘एआय-६७१’ विमानाने मुंबई ते चेन्नई प्रवास करणार होती. चेक इन केल्यानंतर ती विमानाच्या दिशेने रवाना झाली. तिच्या तिकिटावरील तपशील पाहून विमान कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. या महिलेने ए-३२० प्रकारातील विमानाच्या बिझनेस क्लासची संपूर्ण केबिन बुक केली होती. तीही दोघांसाठीच.
एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ए-३२० विमानाच्या बिझनेस क्लास केबिनमध्ये १२ आसने असतात. प्रतिसीट सुमारे २० हजार रुपये आकारले जातात. म्हणजे या महिलेने २ तासांच्या प्रवासासाठी जवळपास अडीच लाख रुपये मोजले. विमान वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असताना असा प्रकार घडणे हे आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याआधी २०१८ मध्ये एका प्रवाशाने पाळीव प्राण्यासह एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून बंगळुरू-दिल्ली प्रवास केला होता. मात्र, पाळीव प्राण्यासाठी संपूर्ण बिझनेस क्लास बुक करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले.
.......
एअर इंडिया एकमेव...
- देशांतर्गत मार्गावर प्रवासी केबिनमध्ये पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीस परवानगी देणारी एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी आहे. एकावेळी जास्तीत जास्त दोन पाळीव प्राण्यांना विमानातून नेता येते.
- या प्राण्यांना शेवटच्या रांगेत त्यांना व्यवस्थित बसवावे लागते. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात एअर इंडियाने देशांतर्गत मार्गावर २ हजार पाळीव प्राण्यांची वाहतूक केली होती.