Join us

संपूर्ण महाराष्ट्र झाला फुटबॉलमय! राज्यात २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी खेळले फुटबॉल - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 7:20 PM

ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा...व्हॉट्स अप, फेसबुकचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा... या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला.

मुंबई, दि. 15 - ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा...व्हॉट्स अप, फेसबुकचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा... या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. महाराष्ट्र मिशन १ –मिलियन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचा शुभारंभ आज सकाळी झाल्यानंतर दिवसभरात लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींनी राज्यभरात फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष फुटबॉल खेळला. यामध्ये १६ लाख २९ हजार १७९ मुलांचा तर ९ लाख ३३ हजार १७४ मुलींचा सहभाग होता. राज्यात १ मिलियन मिशनचे लक्ष २.५ मिलियन पर्यंत पोहचवत मुला-मुलींनी अतिशय उत्साहीपणे फुटबॉल खेळला. अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील सुमारे ३३ हजार शाळांमध्ये प्रत्येकी ३ बॉल चे वाटप करण्यात आले होते. राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमाला फुटबॉल प्रेमी व विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. नाशिक व जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. जळगावमध्ये शासकीय कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी विरुध्द शासकीय अधिकारी यांचे सामने झाले. याठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून या सामन्यांचे चित्रीकरण करण्यात आले. धुळ्यामध्ये साक्री तालुक्यात झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांनी सामन्यांचा आनंद लुटला. तर येथील अल्पसंख्यांक शाळांमध्ये प्रथमच मुली फुटबॉल खेळल्या. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, डोंगराळ भागांमध्ये फुटबॉल खेळण्यात आला. कोल्हापूर मध्ये ४५ क्लब्ज एकत्र येऊन ३ दिवसाच्या फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओरस सेंट्रल जेलचे अधिकारी विरुध्द कैदी यांचा मित्रत्वाचा सामना झाला. देवगड बीच येथे नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्या बीच फुटबॉल स्पर्धा झाल्या. अहमदनगरमध्ये मुकबधिर मुलांच्या स्पर्धा झाल्या. तसेच स्नेहालय संस्थेतील अनाथ मुलांचीही फुटबॉलची स्पर्धा झाली. सोलापूर जिल्ह्यात पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी वयोवृध्द जॉगर्स ग्रुपच्या फुटबॉल स्पर्धेचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

आज मुंबईसह राज्यात शाळा, सेवाभावी संस्था, क्रीडा संघटना, क्लब्ज, महाविद्यालयीन विद्यार्थी, डबेवाले, दिव्यांग विद्यार्थी, आदिवासी, शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आदी फुटबॉल व क्रीडाप्रेमींनी आजच्या मिशन १ मिलियन या उपक्रमात सहभागी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई जिमखाना येथे महाराष्ट्र मिशन १-मिलीयन  या फुटबॉल महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मिशन वन मिलियनचा झेंडा फडकविला. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी सृदृढ शरीर हवे तर फुटबॉल खेळा असे सांगितले होते आणि फुटबॉल खेळल्याने आपण फिट राहतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी फुटबॉल हा उत्तम पर्याय आहे.ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईमध्ये विश्वचषक फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राने आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाच्या निमित्ताने आज लाखो  विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. या उपक्रमाच्या प्रेरणेने शहर व गावांमध्ये अनेक फुटबॉलप्रेमी तयार होतील आणि महाराष्ट्रामध्ये फुटबॉल या खेळाचा अधिक प्रभावीपणे प्रसार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुलांनी ई-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे  तावडे यांनी यावेळी सांगितले. मुंबई जिमखाना येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी आठ संघांचे वेगवेगळे फुटबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएशनचे विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ आदी संघांचा समावेश होता.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री  विनोद तावडे यांनी मुंबई जिमखाना येथे उपस्थित सर्व फुटबॉल संघाना भेटून शुभेच्छा दिल्या.

याबरोबरच मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली २१ ठिकाणी फुटबॉल खेळणार आहेत. ओव्हल मैदान, क्रॉस मैदान, मुंबई जिमखाना, आझाद मैदान, पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह, पारशी जिमखाना, मरिन ड्राईव्ह, इस्लाम जिमखाना, मरिन ड्राईव्ह, विल्सन जिमखाना, मरिन ड्राईव्ह, शिवाजी पार्क, दादर, कुपरेज मैदान, गोवन्स स्पोर्टींग क्लब, कर्नाटक स्पोर्टींग क्लब, मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा, नायगांव पोलीस मैदान, नायगांव,  मुंबई विद्यापीठ, मरिन लाईन्स,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन, जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल,  वरळी स्पोर्टस क्लब, वरळी आणि एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदान, परेल पूर्व येथे फुटबॉल सामने खेळले गेले.

टॅग्स :विनोद तावडेक्रीडा