कोणाला आणि कुठे ? काय हवंय ? सांगणार "हेल्प फ्लेअर"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:26 PM2020-04-23T18:26:05+5:302020-04-23T18:27:30+5:30
सोमैय्या विद्याविहारच्या विद्यार्थ्यांची एप बनवून अनोखी मदत
सीमा महांगडे
मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक समस्या आणि आव्हाने आज समोर उभी आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक अधिकारी, महापालिका, एनजीओ आणि अन्य सामाजिक सहाय्यता गट अशा संस्था व व्यक्ती बाधित व्यक्तींना अन्न, पाणी, कपडे व मास्क यांचा पुरवठा करण्यासाठी पुढे येत आहेत. सध्या समोर असलेल्या आव्हानांमध्ये, मदत हवी असलेले परिसर आणि त्यांना हव्या असलेल्या नेमक्या अत्यावश्यक वस्तू ओळखणे आणि त्यांचा पुरवठा करणे हे एक प्रमुख आव्हान आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबईतील सायन येथील के. जे.सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड इन्फर्मेशन टेक्नालॉजीच्या (केजेएसआयईआयटी) विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने एप - हेल्प फ्लेअर तयार केले आहे. हेल्प फ्लेअर हे एप बाधित व्यक्तींकडे आपले लक्ष वेधण्यास मदत होणारच आहे, मात्र एखाद्या परिसरात कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे याची माहिती ही देणार आहे.
लॉकडाऊनमुळे या काळात बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून या काळात सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळणे आवश्यक आहे. अशावेळी गरजू लोकांना त्यांना आवश्यक असलेली सामग्री मिळणे ही मुश्किल झाले आहे. अशा ठिकाणी हेल्प फ्लेअर'मुळे अत्यावश्यक वस्तू हव्या असलेले परिसर शोधण्यास, तसेच कोणत्या प्रकारच्या अत्यावश्यक वस्तू हव्या आहेत याबद्दल माहिती मिळण्यासाठी मदत होणार. इद्रीस दर्गाहवाला, बुऱ्हनुद्दिन उदयपूरवाला व शिवम भानुशाली या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आम्ही वर्गाध्ये जी शैक्षणिक कौशल्ये शिकलो आहोत त्यांचा वापर करून सध्याच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी काहीतरी नवे निर्माण करू शकलो. ज्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मदत करायची इच्छा आहे त्यांना नकाशावर बाधित परिसर पाहता येतील आणि तेथील लोकांना मदत करता येईल.जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्यासाठी, हे एप इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे.
लॉकडाउननंतर लोकांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने हे एप परिश्रम करून तयार केले असून सध्याचा काळात अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठीच्या विविध पर्यायांपैकी एक आहे. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आमच्या संस्थापकांचे समाजाचे पांग फेडणे हे उद्दिष्टही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
- सुरेश उकरांडे , प्राचार्य