मुंबई : सोशल नेटवर्क साइट्सच्या जमान्यात ‘लक्षात ठेवा, लक्षात ठेवा...’, ‘आवाज...कुणाचा...’, ‘ताई, माई, आक्का विचार करा पक्का...’, या घोषणा जमा झाल्या असल्या, तरीदेखील आजही या घोषणांची चलती असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणांचा पाऊस पडत आहे. आजचा रविवार अशाच काहीशा घोषणांनी दुमदुमला असून, ठिकठिकाणी रंगलेल्या प्रचारसभांनी निवडणुकीचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला.मागचा आठवडा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुगलबंदीने रंगला असून, आता येत्या आठवड्याभरापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभा सुरू होणार आहेत. तत्पूर्वी राज यांच्या मुंबईतील सभांचे वृत्त रविवारी सोशल नेटवर्क साइट्सवरून व्हायरल झाल्यानंतर, मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी जान आली आहे. अशाच काहीशा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचार-प्रसाराने जोर पकडल्याचे चित्र होते.मुंबई शहरात भायखळा, लालबाग, वरळी, लोअर परळ आणि गिरगाव येथील शिवसेनेच्या शाखांसह उमेदवारांसभोवतालची गर्दी वाढली होती. पूर्व उपनगरात कलिना आणि वांद्रे विधानसभा मतदार संघात शिवसेना व मनसेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. कलिना विधानसभेत काँग्रेसनेही प्रचारात आघाडी घेत रान उठवले होते. चांदिवली येथे सेनेची सरशी होती. घाटकोपरसह पुढील परिसरात सेनेसह भाजपाची सरशी दिसून आली.पश्चिम उपनगरात रात्री उद्धव यांच्या सभा रंगल्याने येथे सेनेची सरशी होती. येथील अंधेरी, कांदिवली, मालाड येथील प्रचार फेरीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. दहिसर येथे सेनेची रॅलीत आघाडी असतानाच, गोरेगाव येथे सेना रॅलीत आघाडीवर होती. विशेषत: रविवारचे दुपारचे ऊन टाळण्यासाठी बहुतांशी उमेदवारांनी आपली प्रचार फेरी दुपारी संपण्यावर भर दिला होता.पालिकेतल्या सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपाचे रस्सीखेच सुरू असल्याचे प्रात्यक्षिक रॅलीमध्ये काही प्रमाणात निदर्शनास आले. दोन्ही पक्षांचे उमेदवार झोपड्या, चाळी आणि इमारतीत मतदारांच्या भेटीगाठी घेत असून, रविवारी यात आणखी भर पडली होती. एकंदर रविवारचा दिवस उमेदवारांनी सत्कारणी लावल्याचे चित्र प्रथमदर्शनी असले, तरीदेखील ‘घोडा मैदान’ आठवडाभर लांब आहे. परिणामी, पुढील आठवड्यात राजकीय पक्षांची जुगलबंदी आणखी रंगणार आहे. (प्रतिनिधी)
‘आवाज कुणाचा?’ने दुमदुमली मुंबई
By admin | Published: February 13, 2017 5:23 AM