लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहावी, बारावीच्या निकालानंतर खासगी क्लासचे पेव फुटले आहेत. टक्केवारीची हमी देत विद्यार्थी पालकांना भुलवले जाते. त्यासाठी भरमसाट फी आकारून पालकांची लूट सुरू आहे. त्यात गरजू विद्यार्थ्यांचे हाल होतात. अशा खासगी क्लासवर नियंत्रण मात्र कुणाचेही नाही?
निकालानंतर अनेक खासगी क्लासकडून जाहिरातबाजी केली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो लावून टक्केवारीची हमी दिली जाते. परिणामी विद्यार्थी, पालकांमध्ये टक्केवारीसाठी लालसा निर्माण होते.
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावरच खासगी क्लासकडून जोरदार जाहिरात केली जाते. विद्यार्थ्यांच्या फोटोसह पॅम्प्लेट वाटले जातात. टक्केवारी दिली जाते. सोयी- सुविधांचे फोटो दिले जातात. त्यामुळे अशा क्लासला विद्यार्थी, पालक बळी ठरतात.
शिक्षणावरही प्रश्नचिन्ह?
शाळेत नापास केले जात नसल्यामुळे आठवीपर्यंत आणि पुढे नववी, दहावीत पालिका, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक योग्य पद्धतीने शिकवत नसल्यामुळे पालकांकडून शाळेच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह असते.
भरमसाट फीवर अंकुश कुणाचा?
विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना खासगी क्लास आणि त्यांच्या फी, संदर्भात धोरण निश्चित करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, पुढे या धोरणावर हवा तसा विचार झाला नाही. त्यामुळे खासगी क्लासवर कुणाचाही अंकुश नाही.
शाळेतल्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने विषय शिकवले जात नाहीत. त्यामुळे मुलांना ते कळत नाहीत. कौशल्याचा अभाव शाळेतल्या शिक्षकांमध्ये असतो. खासगी क्लासमध्ये कौशल्यावर भर देऊन विषय शिकविले जातात. - श्रीरंग पालव, पालक
शाळेत शिक्षकांना एवढी कामे दिली जातात की, त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायलाच वेळ नसतो. त्यामुळे पालक खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पाठवतात. - एक खासगी क्लासचालक, वांद्रे.