ही गाडी कुणाची?... सचिन वाझेंचा पाठलाग करणारी कार सापडली, नवं वळण लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:40 PM2021-03-10T17:40:25+5:302021-03-10T17:42:04+5:30
Sachin Waze : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये आरोप झाल्याने पोलीस अधिकारी सचिन वाझे अडचणीत आले आहे.
मुंबई - मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये आरोप झाल्याने पोलीस अधिकारी सचिन वाझे अडचणीत आले आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या हवाल्याने विरोधी पक्षाने सचिन वाझे यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने तसेच या प्रकरणावरून सभागृहात सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी केल्याने अखेर सचिन वाझे यांची क्राइम ब्रँचमधून बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांना करावी लागली होती. या प्रकरणात आता सचिन वाझे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मनसुख हिरेन प्रकरणात विरोधकांनी रान उठवल्यानंतर सचिन वाझेंची क्राइम ब्रँचमधून बदली करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, एक अज्ञात कार आपला पाठलाग करत आहे, असा दावा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला. आहे. या गाडीवर पोलीस असा उल्लेख आहे. मात्र या गाडीचा नंबर बनावट आहे. गाडीच्या मागचा आणि पुढचा क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे ही गाडी कुणाची आणि ती सचिन वाझेंचा पाठलाग का करत होती, असे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीनं खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली.