मुंबई :-पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीच्या या अगोदर पार पडलेल्या बैठकीत आरे तलावात गणेशमुर्ती विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय झाला नसताना, आरे तलावात गणेशमुर्तींना बंदी घालण्या मागे कुटील कारस्थान कुणाचे आहे? आरे तलावातील गणेशमुर्तींना विसर्जनास बंदी घातल्यानंतर येथील जनभावना पत्राच्या रूपाने राज्य शासनाकडे मांडल्या. परंतू या पत्रांना राज्य शासन उत्तरच देत नसल्याने हे सरकार हिंदू विरोधी तर नाही ना? असा प्रश्न जनतेला पडला अहे, असा घणाघात आमदार रविंद्र वायकर यांनी आरे जन आक्रोश आंदोलनावेळी केला.
आरेतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था व आरे तलावात गणेशमुर्ती विसर्जनास आरे प्रशासनाने घातलेली बंदी यांच्या विरोधात राज्य शासनाला जागे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'आरे जन आक्रोश आंदोलनात' सहभागी झालेल्यांना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मार्गदर्शन केले.
आरेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन करण्याची प्रथा व परंपरा आरे प्रशासन पायदळी तुडवत असेल तर जनता गप्प कशी बसू शकेल . आरेतील पर्यावरणाच्या सर्व नियमांचे पालन करीत या अगोदरही गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यापुढेही करण्यात येईल., अशी खात्रीही वायकर यांनी यावेळी दिली. आरेमध्ये छोट्या गणेशमुर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येईल पण या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळातील मोठ्या १००० पेक्षा जास्त गणेशमुर्तींच्या विसर्जनाचे काय?, असा प्रश्नही वायकर यांनी उपस्थित केला.
उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रात सनियंत्रण समितीच्या या अगोदर पार पडलेल्या बैठकांमध्ये आरे तलावात गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत नसल्याने, बंदी घालण्याचा निर्णय झाला असेल तर वन विभागाला अशा निर्णयाची प्रत देण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहे. जर सनियंत्रण समितीने तसा निर्णय अद्याप घेतला नसेल तर हे कुटील कारस्थान कुणाचे आहे. मग असे आदेश कोणत्या अधिकारात काढण्यात आले.? हिंदूंच्या भावना दुखावण्या मागचा, असे आदेश देणाऱ्या अधिकाराचा हेतू काय आहे? असे प्रश्न जनतेला पडले असून आरे प्रशासनाने त्याची उत्तरे जनतेला द्यावीत, अशी मागणी करत मोठ्या गणेशमुर्ती विसर्जनाची काय सोय करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करीत आंदोलना नंतर आमदार रविंद्र वायकर व सुनिल प्रभू यांनी आरे तलावात श्रीफळ अर्पण केले.
यावेळी आमदार व विभागप्रमुख सुनिल प्रभू, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपनगर समितीचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर व विभाग संघटक साधना माने, मुंबई आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांचीही यावेळी भाषणे झाली.