महेश पवार -
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा जागांपैकी महाविकास आघाडीला मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, अशा ४ जागांवर विजय मिळाला. उत्तर पश्चिममध्ये महायुतीच्या उमेदवाराचा केवळ ४८ मतांनी विजय झाला होता तर उत्तर मुंबईमध्ये भाजपचे खासदार निवडून आले. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र काहीसे चित्र वेगळे असणार आहे. लोकसभेतील यशामुळे मुंबईत महाविकास आघाडीतील उद्धवसेना आणि काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. तर महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेना बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, मुंबई कुणाची? याचे चित्र २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आणि शिवसेना महायुतीचे ३० आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी १ आणि सपाचे १ आमदार निवडून आले होते. मात्र, राजकीय समीकरण बदलले आणि शिवसेनेचे उद्धवसेना आणि शिंदेसेना, असे दोन पक्ष निर्माण झाले. त्यामुळे मुंबईत आता भाजपचे १६, उद्धवसेनेचे ८, शिंदेसेनेचे ६, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ आणि समाजवादी पक्ष १, असे आमदार आहेत.
मुंबईत काँग्रेसला अच्छे दिन? २०१९ मध्ये मुंबईत काँग्रेसचे केवळ ४ आमदार निवडून आले होते. पंरतु, महायुती केल्याचा काँग्रेसला मोठा फायदा लोकसभेत झाला. काँग्रेसने ८ मतदारसंघांत मतांची आघाडी घेतली होती. हेच चित्र विधानसभेत कायम राहिले तर मुंबईत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील, अशी चर्चा आहे.
‘मनसे’चे इंजिन धावणार का? गेल्या निवडणुकीत मुंबईतून ‘मनसे’ने २५ उमेदवार दिले होते. त्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे यावेळी तरी ‘मनसे’चे इंजिन मुंबईत धावणार का? याची उत्सुकता आहे.