Join us

राष्ट्रवादी कुणाची? पुन्हा ‘पार्टी गेम’; दोन्ही गटांकडून महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 6:06 AM

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली.

मुंबई : गेल्या वर्षी शिवसेनेतील फुटीनंतर जशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती  पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील उभ्या फुटीनंतर अनुभवायला येत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ज्या पद्धतीने ठाकरे गटाच्या आमदारांना पदावरून दूर करून विविध नियुक्त्या केल्या होत्या त्याचाच कित्ता अजित पवार गटाने गिरविला आहे.

शरद पवार यांनीदेखील खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानिमित्ताने पुन्हा पक्ष-चिन्ह कुणाचे, पक्षाची घटना, फूट की बंड, घटनेचे दहावे परिशिष्ट हे विषय चर्चेला आले आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तारूढ पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे, याचा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सस्पेन्स वाढविला आहे.

विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणूनही जयंत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा पटेल यांनी केली. आमदारांनी अजित पवारांना पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केले आहे. तसेच अनिल पाटील हे आमचे प्रतोद होते, त्यांना त्या पदावर कायम ठेवावे, असे विधानसभा अध्यक्षांना कळविल्याचेही पटेल म्हणाले.

काही इतर नियुक्या... प्रदेश महिला अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांच्या जागी रूपाली चाकणकर.युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सूरज चव्हाण.प्रवक्तेपदी अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे, सूरज चव्हाण.

विधानसभा अध्यक्ष काय म्हणतात?राष्ट्रवादी  पक्षात फूट पडली, असे कोणीही आपल्याला कळवलेले नाही. आज तरी आमच्या रेकॉर्डवर राष्ट्रवादी हा एकच पक्ष आहे. त्यामुळे तो सत्तारूढ आहे की विरोधी, हा पहिला प्रश्न माझ्यासमोर आहे. कोणता पक्ष, कोणाचे प्रतिनिधित्व करतो, हे तपासावे लागेल. जो ग्रुप किंवा जी व्यक्ती हा पक्ष आपलाच आहे, असा दावा करत आहे, तो खरा की खोटा? मूळ पक्ष त्यांचा आहे की नाही? या गोष्टी तपासून घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. 

जयंत पाटील, आव्हाडांविरोधात अपात्रतेची याचिकाराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली असतानाच अजित पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेच्या कारवाईची याचिका दाखल केली आहे. रविवारीच अध्यक्षांना याबाबत पत्र दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मला राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाचा नेता नियुक्त केले आहे. त्यामुळे मी ही याचिका केल्याचे त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अपात्रतेची प्रक्रिया पक्षाद्वारे होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडेही याचा अधिकार नाही. हा अधिकार अध्यक्षांकडे असतो. ही प्रक्रिया पार पाडल्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही, असे सांगत प्रक्रिया दीर्घकाळ चालेल, असे त्यांनी सूचित केले.

टॅग्स :शरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस