पी उत्तरच्या कोकणीपाड्यातील प्रकार
राष्ट्रवादीचा मंत्री असल्याचा भाजपचा दावा
गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
महापालिकेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने केलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यास गेलेल्या पालिका पी-उत्तर विभागाकडून पोलीस बंदोबस्तच काढून घेण्यात यावा, असा फोन राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने केला. त्यामुळे ''तो'' मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपचे स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा यांनी दिला आहे.
मालाडच्या शांताराम तलाव येथील पुलाच्या खाली जवळपास ४०० ते ५०० स्क्वेअर फूट जागा ही पालिकेच्या मालकीची आहे. मात्र, त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित रावराणे यांनी गोडाऊन बनविले असून त्याठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरचा काळाबाजार केला जातो, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे. तसेच याठिकाणी दारू पार्टी करत धिंगाणे घालणे तसेच महिलांना आणून अश्लील चाळे करण्याचे प्रकारही वाढत असून यावर कारवाई करण्याची मागणी मिश्रा यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्रामार्फत केली.
तेव्हा चहल यांनी पी-उत्तरचे सहायक पालिका आयुक्त मकरंद दगडखैर यांना निर्देश दिले आणि त्यांच्या पथकाने कारवाईसाठी डीसीपी (ऑपरेशन) यांच्याकडून पोलीस बंदोबस्तही मिळवला; मात्र कारवाईच्या दिवशी एका मंत्र्याने पोलीस खात्यात फोन करून सदर बंदोबस्तच काढून घेतल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. त्यानुसार यावर कारवाई करावी अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी रावराणे यांना फोन व मेसेजमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
कागदपत्रे सादर केलीच नाहीत
''जागेच्या मालकीचा दावा करणाऱ्या नगरसेवकाला संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, ते ती देऊ शकले नाही. त्यानुसार पालिकेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला जाणार होता. मात्र, ऐनवेळी तो काढून घेण्यात आला.
( मकरंद दगडखैर - सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग )
फोटो: पालिकेच्या जागेवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम