नवी दिल्ली : खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, या वादावर उद्या शनिवारी भारतीय निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळावर दावा करताना दोन्ही गटांकडून या सुनावणीत प्राथमिक म्हणणे मांडले जाणार आहे. मात्र, निकाल काहीही लागला तरी संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही, अशी आक्रमक भूमिका गुरुवारी शरद पवार यांनी घेतली आहे.
निवडणूक आयोगापुढे होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यांतील हवा काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी तालकातोरा स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिनविरोध झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आलेले सर्व ७० प्रस्ताव आपल्याच नावाचे होते. त्या प्रस्तावांवर आणि आपल्या उमेदवारी अर्जांवर फुटून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्याच स्वाक्षऱ्या होत्या. आता तेच लोक ही निवडणूक कायद्यानुसार नसल्याचा दावा करीत आहेत, असे पवार म्हणाले.
उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयुक्तांपुढे दोन्ही गटांकडून युक्तिवाद होणार आहे.
बाजू कोण मांडणार?
शरद पवार गटाकडून : ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी
अजित पवार गटाकडून : ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल आणि मणिंदर सिंह
शरद पवार गटाकडून सुमारे ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली असून, अजित पवार गटाकडूनही ६ ते ७ हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत.
चिन्ह बदलले तरी कुठले बटण दाबायचे लोकांना कळते : पवार
निकाल काहीही लागला तरी संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही, अशी आक्रमक भूमिका आज शरद पवार यांनी घेतली.
काही लोकांचे निवडणूक चिन्ह बदलण्याचे कारस्थान असू शकते; पण मतदार हुशार असतात. निवडणूक चिन्ह बदलले तरी कुठले बटण दाबायचे त्यांना ठाऊक असते.
आपण १९६७ सालापासून बैलजोडी, चरखा, गायवासरू, हाताचा पंजा आणि घड्याळ अशा पाच चिन्हांवर निवडणुका लढल्या; पण आपल्या निकालात फरक पडला नाही, असे पवार म्हणाले.
भांडखोर पक्षांना दिला सल्ला
विधानसभा निवडणुकांमध्ये भलेही एकमेकांविरुद्ध लढा, पण देशाचे राजकारण योग्य मार्गावर आणण्यासाठी लोकसभा निवडणूक मिळून लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सल्ला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधताना सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘इंडिया’ आघाडीतील भांडखोर पक्षांना दिला. देशातील राजकीय वातावरण बदलत असून, परिवर्तन होईल, असा पूर्ण विश्वास आहे, असे पवार म्हणाले.
संघर्ष कधी संपणार?
यापूर्वी, शिवसेनेत झालेल्या अशाच फुटीवर निकाल निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले होते. शरद पवार-अजित पवार गटांचा निवडणूक आयोगापुढचा संघर्ष पुढचे काही आठवडे किंवा महिने चालण्याची शक्यता आहे.