या शाळा कोणाच्या?
By admin | Published: April 10, 2015 10:58 PM2015-04-10T22:58:11+5:302015-04-10T22:58:11+5:30
ठाणे महापालिकेने भविष्याचा वेध न घेता मिळेल त्या जागेवर शाळा उभारल्या आहेत. यातील काही शाळांचे भूखंड आजही मनपाच्या नावे झालेले नाहीत.
नामदेव पाषाणकर, घोडबंदर
ठाणे महापालिकेने भविष्याचा वेध न घेता मिळेल त्या जागेवर शाळा उभारल्या आहेत. यातील काही शाळांचे भूखंड आजही मनपाच्या नावे झालेले नाहीत. भार्इंदरपाडा, ओवळा, पाणखंडा, कोकणीपाडा या शाळांची नोंद स्थावर मालमत्ता विभागाकडे नाही. अनेक शाळांमध्ये दोन ते चार वर्ग एकाच खोलीत घेतले जातात. बेंच न वापरता मुले जमिनीवर बसून ज्ञानार्जन करत आहेत. टकरडा, कोकणीपाडा येथील शाळेत चक्क सापांचा वावर असतो.
टकरडा शाळा क्र मांक १०१ ही सातवीपर्यंत असून एकूण १५४ पटसंख्या असलेल्या शाळेत तीन खोल्या, चार शिक्षक व एक मुख्याध्यापक आहे. पाचवडपाडा, देवीचापाडा, गवणीपाडा, बोरिवडे, टकरडा येथील आदिवासी मुले एक ते दीड किमी चालून शाळेत येतात. ही शाळा भाड्याच्या जागेत असून मालक बाळाराम ठाकरे यांना दरमहा साडेचार हजाराचे भाडे देण्यात येते.
पाणखंडा शाळा क्र मांक ५९ वनजमिनीवर बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे ती दुर्लक्षित राहिलेली आहे. या शाळेला ये-जा करण्यासाठी नीटसा रस्ता नाही. वनखाते आडकाठी करीत असल्यामुळे हे काम होत नाही. शाळा बांधण्यासाठी दानशूर लोकांनी मदत केल्यामुळे शाळा उभी राहिली आहे. मुख्य रस्त्यावरून दोन किमी चालत शिक्षक येतात. या शाळेत खालचा व वरचा देवीचापाडा, कांबळीपाडा, बामणाली, पाणखंडा येथील मुले शिकत आहेत. पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या शाळेत १३७ विद्यार्थी शिक्षण घेतात. आदिवासी लोकांत शिक्षणाचा अभाव असल्यामुळे येथील मुले शिक्षणापासून लांब राहतात. त्यामुळे पटदेखील कमी आहे. येथील रहिवासी नागरी सुविधांपासून वंचित असल्याने गावात पक्का रस्ता, नळपाणी नाही. शाळेतील विद्यार्थीही बोअरिंगचे पाणी पितात.
शाळा क्रमांक ५६ ही ओवळा गावात असून पहिली ते आठवीचे वर्ग भरतात. ही शाळा ग्रामपंचायत असतानाची आहे. या शाळेत ३२९ मुले शिकत असून ८ शिक्षक, एक मुख्याध्यापक, शिपाई, सुरक्षारक्षक आहेत. चार शिक्षक कमी असल्याने आहे त्या शिक्षकांवर ताण पडतो.