लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: खरी शिवसेना कोणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असले तरी त्याचा एक फैसला बुधवारी सायंकाळी मुंबईत आयोजित दोन दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने ‘जनता की अदालत’मध्ये होणार आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले मेळावे तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येण्यास आधीच सुरुवात झाली आहे. शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.
आधी कोण बोलणार?
दोन्ही मेळाव्यांची वेळ साधारणत: सारखीच आहे. मात्र, आधी उद्धव ठाकरे बोलणार की एकनाथ शिंदे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ठाकरे यांचे साधारणत: ८ ला सुरू होते. त्यांचे भाषण झाल्यावर त्याला शिंदे यांनी तडाखेबंद उत्तर द्यावे, असा शिंदे गटाचा प्रयत्न असेल.
५१ फुटी तलवार पूजन
शिंदे यांच्या मेळाव्यात ५१ फुटी तलवारीचे पूजन केले जाईल. उद्योग मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री शिंदे यांना १२ फुटाची तलवार भेट देणार आहेत. बीकेसी मैदानात १०० एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत.
४८०० बसेसचा ताफा
- शिंदे गटातील आमदार, नेते, खासदार यांनी तब्बल तीन हजार खासगी आणि १८०० एसटी गाड्यांचे बुकिंग केले आहे.
- ठाकरे गटाने इतक्या गाड्या लावल्या नसल्या तरी मुंबईतील शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून चार बसेस आणल्या जातील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"