ऐकायचं नेमकं कोणाचं... मोबाइलचं की घरच्यांचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 07:47 AM2023-12-10T07:47:30+5:302023-12-10T07:48:32+5:30
ओपन ए-आय, चॅट जीपीटी, बार्डमुळे केवळ रोजगाराच्या संधीच कमी होणार नसून त्याचे शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक स्वरूपांचे इतरही परिणाम होणार आहेत. सक्षम, निकोप आणि सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी एक सुधारित डिजिटल संस्कृती रुजवणे आवश्यक आहे. अन्यथा तरुण पिढी आपली नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमताच हरवून बसेल. मोबाइलमग्न मुले हे नवे आव्हान ठरणार आहे.
जयवंत कुलकर्णी, समुपदेशक
सरकार काय करू शकते?
शासनस्तरावरून शाळा, महाविद्यालयांकडे प्रत्येक माहिती ऑनलाईन स्वरूपात मागविणे, अशैक्षणिक कामे देऊन शिक्षक-विद्यार्थी संवादात अडथळे आणणे, पाठ्यपुस्तके-उपक्रमांद्वारे स्क्रीन टाइम पूरक गोष्टींचा अंतर्भाव करणे अशा बाबी थांबणे आवश्यक आहे.
नवी पिढी कडेलोट अवस्थेवर
एकाग्रतेचा अभाव, अतिचंचलता, स्थूलता, दृष्टिमांद्य / दौर्बल्य, वाचन-लिखाण कौशल्यांचा प्रचंड अभाव, अस्थिर मनोवस्था, टोकाच्या भावना व विचारांत वाढ, आक्रमकता, हट्टीपणा, फोमोसारखे (फिअर ऑफ मिसिंग आऊट) विकार, परिणामांचा विचार न करण्याची वृत्ती.
पोर्नोग्राफीचे वाढते वेड, हॅकिंग, ऑनलाइन बुलिंग, व्यसनाधीनता, नैराश्य, ब्लू व्हेल, पब्जीसारख्या जीवघेण्या खेळांना बळी पडल्याच्या असंख्य घटना.
रिल्स लाइफ आणि रिअल लाइफमधील कमी झालेले अंतर
घराघरांत ताणलेले नातेसंबंध, कमी झालेला संवाद.
‘ही’ आहे पालकांची जबाबदारी
घरात पालकांनी मुलांना कृतियुक्त खेळात गुंतवावे. त्यांना पुरेसा वेळ द्यावा. मुक्त संवाद साधावा. फक्त अभ्यासासाठी ठरावीक स्क्रीन टाइम कसा देता येईल, डिजिटल सुरक्षेचे उपाय कसे अमलात आणता येतील, याचा कसोशीने प्रयत्न करावा. पालकांनी स्वतः आधी मोबाइल दूर सारला पाहिजे.
शाळांनी काय करायला हवं?
शाळेने सगळ्याच गोष्टी स्क्रीनशी जोडल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मोबाइलवर पालकांना वारंवार सूचना किंवा घरचा अभ्यास देणे, वर्गसमूहावर सक्रिय राहणे, वर्गात शिक्षकांनी मोबाइल वापरणे, मैदानी खेळांना पुरेसा वेळ न पुरविणे पूर्णतः थांबणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शाळेत समुपदेशक असावेत, अशी शिफारस नव्या शैक्षणिक धोरणात केलेली आहे. मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन सेवा मिळणे महत्त्वाचे आहे.