Join us

आवाज कुणाचा...? वर्चस्वासाठी शिवसेनेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 1:00 AM

मुंबई शहर, पूर्व उपनगरातील स्थिती । काँग्रेस चंचुप्रवेशाच्या प्रयत्नात, तर भाजप स्ट्राईकरेट कायम राखण्याच्या स्थितीत

गौरीशंकर घाळेमुंबई : मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील एकूण १८ जागांवर आपले वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे चार्ज झालेले शिवसैनिक आणि चंचुप्रवेशाच्या प्रयत्नातील काँग्रेस अशी लढाई येथे रंगली आहे.

युतीकडून १८ पैकी ११ जागांवर शिवसेना आणि सात जागांवर भाजप लढत आहे. तर, आघाडीत काँग्रेस १४, राष्ट्रवादी ३ आणि एका जागेवर सपा अशी वाटणी आहे. युतीच्या जागावाटपात झुकते माप मिळाल्याने वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळे वरळीतील लढत लक्षवेधी बनली आहे. राष्ट्रवादीने सुरेश माने यांच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तोकडा ठरत आहे. आदित्य यांच्यामुळे शेजारील भायखळा, मुंबादेवी, शिवडी, माहिम या मतदारसंघातील शिवसेना चार्ज झाली आहे.

युतीमध्ये कमी जागा लढूनही अधिक जागा जिंकायच्या हे भाजपचे सूत्र होते. त्याचा फायदा इथे भाजपला होत आहे. सातही जागांवरील भाजपचे पक्ष संघटन मजबूत आहे. घाटकोपर पूर्वेत प्रकाश मेहता यांच्या जागी संधी मिळालेले पराग शाह, मुलुंडमध्ये सरदार तारा सिंग यांच्या जागेवर आलेले मिहिर कोटेचा यांची भिस्त त्यावरच आहे. राम कदम मध्यंतरी वादंगात होते. परंतु घाटकोपर पश्चिमेत लाभान्वितांची संख्या त्यांची जमेची बाजू आहे. सायनमध्ये भाजपने तमिळ सेल्वन यांना पुन्हा संधी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या गणेश यादव यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वडाळ्यात कालिदास कोळंबकर यांच्याविरोधातील नाराजीचा लाभ उठविण्याचेही अवसान सध्या काँग्रेस पक्षात दिसत नाही.

काँग्रेससाठी धारावीत आमदार वर्षा गायकवाड, मुंबादेवीत आमदार अमिन पटेल हे दोन आशेचा किरण आहेत. अणुशक्तीनगरमधील लढाई राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांच्यामुळे रंगतदार बनली आहे. मात्र, संजय दिना पाटील, सचिन अहिर यांचे पक्षांतर येथील शिवसेना उमेदवारांच्या पथ्यावर पडणार का, हा प्रश्न आहे. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी शिवाजीनगर - मानखुर्द ही जागा राखण्यासाठी सर्व शक्तीनीशी मैदानात आहेत. तर, भायखळ्यात वारिस पठाणांसमोरही आव्हान आहे. दोन्ही उमेदवारांनी पडद्यामागून परस्पर सहकार्याची भूमिका घेतली आहे. मुस्लीम मतांसाठीची ही छुपी आघाडी यशस्वी होते का, हे निकालातून स्पष्ट होईल.रंगतदार लढतीमाहिममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी लढाई रंगली आहे. तुल्यबळ लढतीत भाजप समर्थक वर्ग मतदानाला उतरेल याची काळजी सरवणकरांना घ्यावी लागणार आहे. तर, मनसेचा झगडा पुनरुज्जीवनासाठी आहे.भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप अशी तुल्यबळ लढत कुलाब्यात आहे. बालेकिल्ला परत खेचण्याची काँग्रेसची धडपड आहे. दलबदलू ही नार्वेकरांची प्रतिमा विरोधकांच्या टार्गेटवर आहे. तर, संघटनेच्या क्षमतेवर भाजपची भिस्त आहे.भायखळ्यात विद्यमान आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि अभासेच्या गीता गवळी उभ्या आहेत. येथील चौरंगी लढत अटीतटीची बनली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019वरळीशिवसेनाकाँग्रेस