मुंबई : मराठीत समृद्ध कोशवाङ्मय आहे. या विषयावर वेळोवेळी बरेच लिखाणही होत असते. भाषा संचालनालयातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध कोशांसाठी आता सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा प्रभावी वापर होत आहे. कोशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नव्या-जुन्या संज्ञांची चर्चा आता व्हॉट्सअॅपवर होत असून त्यात खुद्द भाषा संचालक आणि उपसंचालक यांचाही समावेश आहे.संचालनालयाच्या संचालकपदी डॉ. मंजूषा कुलकर्णी यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘परिभाषा आणि निर्मिती’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू आहे. या माध्यमातून संचालनालयाच्या कोशांमध्ये निवडल्या जाणाऱ्या संज्ञांची चर्चा करण्यात येते. आपल्या परिसरातील वस्तू, प्राणी, व्यक्ती, सांस्कृतिक संकल्पना इ. गोष्टींची माहिती देणारे कोश आणि भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ यांची माहिती देणारे कोश अशा सर्वच विषयांची चर्चा या ग्रुपच्या माध्यमातून होते. विविध भाषांमध्ये शब्दांची देवाण-घेवाण, त्या शब्दांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर ग्रुपमधील भाषातज्ज्ञ, भाषा अभ्यासक, भाषाप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात येते. व्हॉट्सअॅपच्या या ग्रुपमध्ये काही अचूक संज्ञांची निवड केली जाते. त्या शब्दांवर प्रत्यक्ष बैठकीत पुन्हा चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय घेऊन शिक्कामोर्तब केले जाते. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चर्चेत संचालनालयाच्या संचालक डॉ. कुलकर्णी आणि उपसंचालक अरुण गोसावीही सहभाग घेतात. पारिभाषिक शब्दांची रचना करताना अनेकदा लॅटिन किंवा संस्कृत या भाषेला प्राधान्य दिले जाते, असे निरीक्षण ग्रूपमधील तज्ज्ञांनी वर्तविले आहे. ‘इकोनॉमिक सेन्सस सेल’ या शब्दाला आर्थिक जनगणना घटक असे न म्हणता आर्थिक जनगणना सेल म्हणावे, अशा प्रकारची चर्चा भाषातज्ज्ञ आणि भाषाप्रेमी मांडतात. तसेच ‘उद्दात्त’ या शब्दाचा अर्थ ‘हायपीच’, ‘अनुदात्त’ याचा अर्थ ‘लोव्हपीच’ आणि ‘फॉलिंग पीच’ला ‘स्वरीता’ म्हटले जाते. ‘आऊटसोर्सिंग’ या शब्दाला ‘बाह्यस्रोत’ म्हटले जाते. अशा एक ना अनेक पद्धतीने या ग्रूपवर संज्ञांबाबत चर्चा केली जाते.साहित्य-समीक्षा, अर्थशास्त्र, वनस्पतिशास्त्र, औषधशास्त्र, धातुशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषिशास्त्र, भाषा विज्ञान अशा विविध विषयांवर संचालनालयाने आतापर्यंत ५२ कोश तयार केले आहेत. हे कोश अद्ययावत करण्याबरोबरच नव्या काळाशी सुसंगत अशा इतर दहा विषयांवर नवे कोश तयार केले जाणार आहेत. कोशाच्या संज्ञानिर्मितीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चर्चेचा उपयोग होतो. या माध्यमातून अधिकाधिक भाषातज्ज्ञ आणि भाषाप्रेमींपर्यंत सहज पोहोचता येते.- डॉ. मंजूषा कुलकर्णी, भाषा संचालक
कोशांच्या संज्ञांसाठी व्हॉट्सअॅपचे व्यासपीठ
By admin | Published: July 26, 2015 3:36 AM