Join us

माझं व्हिजन - "अपघात का हाेतात, कारणे शाेधून काढणार, समृद्धीवर विशेष लक्ष"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:38 AM

लहान रस्त्यांसोबतच द्रुतगती महामार्ग, एक्स्प्रेस वे, फ्री वे, आदींवर वाहन चालवताना चालकांचे वाहनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे

 डॉ. रवींद्र सिंगलअप्पर पोलिस महासंचालक, वाहतूक

मुंबईसह राज्यभरात अपघातांचे सत्र सुरू आहे. राज्यभरात विविध रस्त्यांवर एकूण १,००४ ब्लॅक स्पॉट आहेत. अशा ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी शॉर्ट, मीडियम आणि लाँग टर्मनुसार काम करण्यात येत आहे. या भागातील अपघातांची नेमकी कारणे शोधून त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. भरधाव वेग, झोप येणे आणि टायर फुटणे अशी विविध कारणे अपघातांमागे आहेत. यासाठी जनजागृती हेच सर्वांत प्रभावी अस्त्र आहे. त्यामुळे जनजागृतीवर जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे.

लहान रस्त्यांसोबतच द्रुतगती महामार्ग, एक्स्प्रेस वे, फ्री वे, आदींवर वाहन चालवताना चालकांचे वाहनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामे सुरू आहेत. अशा ठिकाणी बॅरिकेड्स आणि आवश्यक सूचनाफलकांची कमतरता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेशी पाठपुरावा करून त्यांची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून वाहतुकीस होणारा अडथळा, विलंब कमी करता येईल. घाटरस्ते, दरी अथवा कातळ भिंतीच्या खालून जाणारे रस्ते या ठिकाणी जर धुके, ढग उतरून येण्याचे प्रमाण अधिक असेल तर जिल्हा प्रशासनाने धोकादायक ठिकाणी, दरीच्या बाजूला उघडझाप होणारे सोलरचे किंवा विजेचे दिवे बसवून घेण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे वाहनांना धोकादायक ठिकाणांची जाणीव करून देता येईल. अशा ठिकाणांची तातडीने पाहणी मोहीम राबविण्यात यावी. यासाठी स्वयंसेवी संघटना, गिर्यारोहकांचे डोंगर बचाव दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपदा मित्र यांच्यासमवेत भेटींचे आयोजन करून धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्याचा अहवाल मागविणार आहाेत.

‘समृद्धी’वर विशेष लक्ष...समृद्धी महामार्गावरील अपघात चिंतेचा विषय  आहेत. गेल्या सहा महिन्यांत समृद्धीवर ६०० हून अधिक अपघात घडले. त्यात शेकडो बळी गेले. या मार्गावरही सुरक्षेच्या दृष्टीने सूचनाफलक लावण्यात येत आहेत.

पावसाळ्यात घाट रस्त्यांबाबत काळजीपावसाळ्यात ज्या ठिकाणी घाटरस्त्यावर ढग उतरतात किंवा धुके असते, अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची तपासणी अनिवार्य आहे. वाहनांची तंदुरुस्ती चाचणी, ब्रेकची तपासणी व त्याचे दर महिन्याचे ऑडिट प्रत्येक वाहनाने करून घेणे गरजेचे आहे, पाऊस सुरू असताना दरीकडचा भाग ओळखून खबरदारी घेणे आणि वाहनांच्या वायपरची तपासणी करणे गरजेचे आहे.

पादचाऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची

 विविध अपघातांत गेल्या वर्षी २,८९४ पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. पादचाऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्याकडेही आमचे लक्ष आहे. 

टॅग्स :वाहतूक कोंडीअपघात