यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याबद्दल आणि पालकमंत्री पदांचे वाटप होत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे आहे. तसेच आणखी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद त्यांना हवे आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याबद्दलही ते नाराज असल्याचे म्हटले जाते.
छगन भुजबळ यांना नाशिकचे, हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे, धनंजय मुंडे यांना बीडचे तर अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे असाही त्यांचा आग्रह असल्याचे मानले जाते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील मंत्रिमंडळाचा विस्तार हवा आहे पण भाजपच्या श्रेष्ठींकडून विस्ताराला मान्यता मिळत नसल्याने अडचण झाली आहे. विस्ताराचा मार्ग मोकळा व्हावा म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे.
वित्त मंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांना हवी तशी मोकळीक मिळत नाही अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकतर त्यांच्याकडून फाईल ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते व तेथून ती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकङे अंतिम मान्यतेसाठी जाते. काही धोरणात्मक व महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेताना मुख्यमंत्री शिंदे हे बारकाईने सर्व बाजू तपासतात. त्यामुळे अपेक्षेनुसार वेगाने फाईलींचा प्रवास होत नाही हेही एक कारण सांगितले जात आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल पण प्रत्येक निर्णय हा सर्व बाजू तपासून झाला पाहिजे असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतो. मध्यंतरी अजित पवार यांनी अर्थ खाते त्यांच्याकडे राहील की नाही या बाबत शंका व्यक्त करणारे विधान केले होते. अर्थ मंत्री म्हणून काम करतानाचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही अशी त्या मागची नाराजी असल्याचे बोलले गेले होते.
काका शरद पवार यांना आव्हान देत अजित पवार यांना आपला पक्ष वाढवायचा आहे. अशावेळी पक्षातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांना बळ द्यायचे तर महामंडळे व प्रमुख समित्यांवरील नियुक्त्या लवकर व्हाव्यात असाही अजित पवार यांचा आग्रह असल्याचे आणि तसे होत नसल्यानेही ते नाराज असल्याची चर्चा आहे.