मला टॉर्चर का केलं जातंय, या देशाकडून उत्तर हवंय; कंगना राणौतचा नवा व्हिडीओ
By स्वदेश घाणेकर | Published: January 8, 2021 02:11 PM2021-01-08T14:11:31+5:302021-01-08T14:12:34+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut ) ही पुन्हा चर्चेत आली आहे. मुंबईत कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघी शुक्रवारी वांद्रे पोलिसांसमोर देशद्रोहाच्या प्रकरणात आपले जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut ) ही पुन्हा चर्चेत आली आहे. मुंबईत कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघी शुक्रवारी वांद्रे पोलिसांसमोर देशद्रोहाच्या प्रकरणात आपले जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या. कंगना आणि रंगोली यांना वांद्रे पोलीस चौकशीसाठी अनेकदा बोलावले. मात्र, कायदेशीर पळवाटा शोधून त्या तारखा टाळण्यात आल्या होत्या. कंगनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात तिला टॉर्चर का केलं जातंय, असा सवाल करत भारतीयांकडून उत्तर मागितले. अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानं आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचंही ती म्हणाली.
''जेव्हा जेव्हा मी अन्यायाविरोधात आपलं मत मांडते, तेव्हा तेव्हा माझ्याविरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. माझा मानसिक, भावनिक आणि आता शाररिक छळ का केला जात आहे?, या देशाकडून मला याचे उत्तर हवंय... मी तुमच्यासाठी नेहमी उभी राहिली आणि आता तुम्ही माझ्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. जय हिंद!'', असं तिनं ट्विट केलं.
पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती म्हणले,''माझ्यावर अन्याय होतोय, हे संपूर्ण देश पाहत आहे. माझं घर पाडण्यात आलं, शेतकरी आंदोलनाविरोधात बोलले, म्हणून अनेक तक्रारी दाखल केल्या गेल्या. एकाने तर मी हसले म्हणूनही तक्रार केली. कोरोना काळात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रसंगात माझ्या बहिणीनं मत व्यक्त केलं, त्यावेळेसही तिच्या आणि माझ्या विरोधात तक्रार झाली. त्यावेळी मी तर काही ट्विटही केलं नव्हतं.''
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation.... I stood for you it’s time you stand for me ...Jai Hind 🙏 pic.twitter.com/qqpojZWfCx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2021
''मी मध्ययुगीन काळातील महिला आहे का, की जिथे महिलेला जीवंत जाळले जाते, सर्वोच्च न्यायालयाला मी हा सवाल विचारू इच्छितो,''असेही कंगना म्हणाली.
पाहा व्हिडीओ...
...अखेर कंगना, तिची बहीण रंगोली वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
गेल्या वर्षी १७ ऑक्टोबरला कंगनाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली होती. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा एफआयआर भादंवि कलम २९५(अ), १५३(अ) आणि १२४(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते.