मृत बाळ जन्माला का येते? काय काळजी घ्याल? गरोदर महिलेने नियमित तपासणी करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:06 PM2023-06-06T13:06:30+5:302023-06-06T13:06:50+5:30

बाळाचा जन्म होणे, ते रुग्णालयातून घरी येणे हा सगळ्याच पालकांसाठी आनंदाचा क्षण.

why are stillborn babies born what care a pregnant woman should have regular checkups | मृत बाळ जन्माला का येते? काय काळजी घ्याल? गरोदर महिलेने नियमित तपासणी करणे गरजेचे

मृत बाळ जन्माला का येते? काय काळजी घ्याल? गरोदर महिलेने नियमित तपासणी करणे गरजेचे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बाळाचा जन्म होणे, ते रुग्णालयातून घरी येणे हा सगळ्याच पालकांसाठी आनंदाचा क्षण. मात्र काहीवेळा आईच्या पोटातच बाळ दगावते. तो क्षण पालकांसाठी दुःखद असतो.  काही वैद्यकीय समस्यांमुळे बाळाचा मृत्यू होऊन बाळ मृत जन्माला येते. त्याला स्टील बर्थ असेही म्हणतात. 

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय व्यवस्था अनेक ठिकाणी पोहोचल्याने अशा पद्धतीने मृत बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र काही ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना शहरातील रुग्णालयात मृत बाळ जन्माला येण्याचे प्रमाण असते. त्यामुळे घरातील सदस्यांनी बाळंतिणीची काळजी पहिल्या महिन्यापासून घेण्याची गरज असून तिच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. बाळंतपणात डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याचे व्यवस्थित पालन केले पाहिजे.    

मुंबईत परळ येथील वडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कामा रुग्णालये ही प्रसूतीसाठी स्वतंत्र रुग्णालये आहेत. तसेच मग वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालये, महापालिकेची उपनगरातील रुग्णालये, प्रसूती रुग्णालये, खासगी रुग्णालयात, नर्सिंग होममध्ये प्रसूती होत असतात. शहरातील एकूण रुग्णालयातील स्टील बर्थचा आकडा घेतला तर तो शेकड्यात जाऊ शकतो.  

स्वतःहून औषधे घेऊ नये

गरोदरपणात कुठल्याही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत. कारण ती तुमच्या पोटातील बाळास हानी पोहोचवू शकतात. गरोदरपणात सर्व औषधोपचार डॉक्टरी सल्ल्यानेच करावा. जुनाट आजारासाठीही डॉक्टरांना विचारून कोणती औषधे घेऊ शकतात तीच घ्यावीत.

ही काळजी घ्या 

- गरोदर महिलेने नियमितपणे स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जात तपासणी करावी.  
- मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असेल तर संबंधित डॉक्टरांकडून तपासण्या करून औषधोपचार करावेत
- डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे सोनोग्राफी वेळच्या वेळी करून घ्याव्यात.
- प्रसूती ज्या ठिकाणी करणार आहात त्या दवाखान्यात नावनोंदणी करून ठेवावी.

गेल्या काही वर्षांत स्टील बर्थचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही काहीवेळा या घटना घडत असतात. त्यासाठी महिलांनी गर्भधारणा राहिल्यापासून डॉक्टरांकडे येऊन तपासणी केली पाहिजे. उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि मधुमेह असणाऱ्या महिलांची गरोदरपणात विशेष काळजी घ्यावी लागते. चांगले औषधोपचार व्यवस्थापन करणे शक्य आहे.     - डॉ. तुषार पालवे, स्त्रीरोगतज्ज्ञ

 

Web Title: why are stillborn babies born what care a pregnant woman should have regular checkups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य