Join us

Maharashtra Government: दैवतांची नावे घेतली तर एवढा राग कशाला?, जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:10 AM

'विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा, अशी अपेक्षा आहे.'

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले, आंबेडकर-शाहूंची नावे शपथविधीच्या वेळी घेतली म्हणून फडणवीस आणि भाजप यांना एवढा राग का आला, ही असुया आजची नाही पिढ्या न् पिढ्यांची आहे, अशी टीका ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मंत्र्यांनी नियमानुसार शपथ घेतली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या, ‘शपथ नियमानुसार नव्हती’ या विधानाचा धागा पकडून जयंत पाटील यांनी टीकेची संधी साधली.विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा, अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेता होण्यासाठी त्यांच्याकडे चंद्रकांत पाटील व फडणवीसांमध्ये स्पर्धा दिसते. भाजपला त्या बाबत पूर्ण विचार करण्याची संधी द्या, असा चिमटाही पाटील यांनी काढला.ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यपालांनी दिलेली शपथ मंत्र्यांनी नियमानुसारच वाचली. त्याच्या आधी व नंतर ते काय बोलले याचा शपथेशी संबंध नसतो. संसदेतही अशा पद्धतीने शपथ घेतात मग तेही नियमबाह्य असेल तर संसदच बरखास्त करावी लागेल. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले की, संजय राऊत यांनी १७० चा आकडा दिला होता, तो आज सिद्ध झाला. विरोधकांनी आज सभागृहात उपस्थित राहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते.विरोधी पक्षनेताच मला दिसत नाही, असे निवडणूक प्रचारात फडणवीस म्हणत होते. तेव्हाच, तुम्ही आरशासमोर उभे राहा.तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल, असे मी म्हणालो होतो ते आज खरे ठरले आहे.

टॅग्स :जयंत पाटील