Join us

महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; राज्यपालांच्या सरकारला कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 6:43 AM

राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली

मुंबई : राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयांतील वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. विद्यार्थ्यांचीही तशीच मागणी आहे. मात्र सरकारच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरू करता येत नाहीत. त्यामुळे  प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. महाविद्यालये सुरू न करण्याचा निर्णय विसंगत आणि विपरीत असल्याचे राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता तसेच राज्यातील सर्व २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. आज इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असल्याचे वर्तमानपत्रांतून कळते. महाविद्यालये व विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरू न होणे विसंगत व विपरीत वाटते. विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरू केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्गदेखील होत आहेत. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशा वेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येतील का किंवा पाळीमध्ये चालविता येतील का, याचा विद्यापीठांनी विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगानेही महाविद्यालय कसे सुरू करावे याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरू करण्याबद्दल आपण होऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले विद्यापीठांमध्ये संवैधानिक पदांशिवाय शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळजवळ ५० टक्के पदे रिक्त असल्याचे काही कुलगुरूंनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.

रिक्त पदे भरण्याची अनुमती तत्काळ द्या : राज्यपालविद्यापीठांमधील अनेक  पदे रिक्त असल्यामुळे प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची अनुमती द्यावी, अशीही मागणी कुलगुरूंनी केली.  या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यापीठांना ही पदे तातडीने भरण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू करण्याबाबतही लवकर निर्णय घ्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीविद्यापीठराज्य सरकार