मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती. सदर प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याने तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. त्याचबरोबर भाजपाकडून टीव्ही मालिकांच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला होता, त्याविरोधात काँग्रेसने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अश्विनीकुमार यांनी कारवाई केली होती. यामुळेच आचारसंहिता लागू असतानाही तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने फडणवीस सरकारचा प्रस्ताव नाकारला. तरीही विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा नविन प्रस्ताव पाठवून त्यांची बदली केली. यातूनच तत्कालीन फडणवीस सरकारचा हेतू शुद्ध नव्हता हे स्पष्ट होते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.सावंत यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या नेमणुकीची प्रक्रिया संशयास्पद आहे, असा आरोप करून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. यासंदर्भात शनिवारी त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागातील दक्षता विभागाने माहिती अधिकारात दिलेले उत्तर जाहीर केले.