नवी दिल्ली : उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची पत्नी शिल्पा शेट्टी हीदेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बॉलिवूडसह जवळच्या मित्रांनीही तिच्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यानंतर अभिनेत्री रिचा चड्ढा ही शिल्पाच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना दोषी ठरविले जाते. हे कधी थांबणार, असा प्रश्न रिचाने केला आहे.या प्रकरणात शिल्पा शेट्टीवरही संशयाची सुई आहे. त्यामुळे कुणीही तिच्या समर्थनासाठी उभे राहिले नव्हते. इतर प्रकरणांपेक्षा हे प्रकरण वेगळे असून स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करत असल्याचे एका बॉलिवूड अभिनेत्याने म्हटले होते. मात्र, हंसल मेहता यांनी ट्वीट करून शिल्पाला पाठिंबा दिला होता. त्यांच्यापाठोपाठ अभिनेत्री रिचा चड्ढा हीदेखील पुढे आली आहे. हंसल मेहता यांचे ट्वीट तिने रिट्वीट करून म्हटले, की पुरुषांनी केलेल्या चुकांसाठी महिलांना दोषी ठरविले जाते. हा एक राष्ट्रीय खेळच बनला आहे. हे कधी थांबणार, असा सवालही तिने केला. त्यापूर्वी हंसल मेहता त्यांनी ट्वीट करून सेलिब्रिटींना सुनावले होते. ते म्हणाले, की तुम्ही तिच्यासाठी उभे राहू शकत नसाल तर किमान तिला एकटे सोडा आणि कायद्याला ठरवू द्या. सेलिब्रिटी अशा परिस्थितीत एकटे पडतात आणि न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच त्यांना दोषी ठरविले जाते.
पुरावे नाहीत...राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर झालेल्या वार्तांकनाविरोधात तिने न्यायालयात धाव घेतली होती. प्रसारमाध्यमांना बदनामीकारक आणि अयोग्य वार्तांकनापासून रोखण्याची मागणी तिने केली होती. मात्र, न्यायालयाने ती मान्य केली नाही. या प्रकरणात शिल्पाला क्लीनचिट दिलेली नाही. मात्र, पोलिसांना तिच्याविरोधात ठोस पुरावेही आढळलेले नाहीत.