Join us  

विमानाच्या एकाच तिकिटासाठी आमच्याकडून दोनदा पैसे का घेता?; प्रवाशांचा कंपन्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:28 AM

प्रवाशांनी तक्रार करण्याचे ग्राहक पंचायतीचे आवाहन

-मनाेज गडनीसमुंबई : अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी काही वर्षांपासून विमान कंपन्यांनी विशिष्ट आसन व्यवस्थेसाठी अधिकचे पैसे आकारण्यास सुरुवात केली. मात्र, तिकीट काढलेल्या लोकांना योग्य आसन देण्याची जबाबदारी विमान कंपन्यांची असूनही ते पैसे न देणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीच्या जागा देण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे एकाच तिकिटासाठी दोनदा पैसे का मोजायचे, असा सवाल आता प्रवासी करत आहेत. 

पाच वर्षांपासून विमान कंपन्यांनी विशिष्ट आसनांसाठी अतिरिक्त पैसे आकारण्याची पद्धती सुरू केली. यामध्ये पहिल्या रांगेतील सीट असेल किंवा मधल्या दरवाजा जवळची सीट असेल, तिथे पाय पसरण्यासाठी अधिक जागा असल्याने त्या सीटसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते. मात्र, सरत्या काही वर्षांत पहिल्यांदा एकूण आसन क्षमतेच्या १० टक्के मग २० टक्के या पद्धतीने सीटची विक्री करण्यास सुरुवात केली. २०२२ वर्षाच्या सुरुवातीला हे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले तर गेल्या वर्षभरात यामध्ये तब्बल १६ टक्के वाढ होत हे प्रमाण ५१ टक्क्यांवर पोहोचले. 

मोफत सीटची अडचण काय ?

विमानाच्या मधल्या सीटसाठी पैसे आकारले जात नाहीत. तीन सीटची एक रांग या पद्धतीने विमान कंपन्यांची बैठक व्यवस्था असते.  खिडकीची सीट आणि बाहेरची सीट या दोन्ही सीटची विक्री केली जाते. जे खुर्चीसाठी पैसे देणार नाहीत, त्यांना मधल्या रांगेतील मोफत आसन दिले जाते. मात्र, यामुळे कुटुंबाला एकत्र बसता येत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी अडचण होते. ते एका सीटवर आणि त्यांच्यासोबतची व्यक्ती दुसऱ्या सीटवर. त्यामुळे त्यांची अडचण होते.

किती पैसे जास्त जातात?विमानाच्या सुरुवातीच्या खुर्च्या ते मधल्या दरवाजापर्यंतच्या रांगेतील खुर्च्यांसाठी प्रामुख्याने अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. या खुर्च्यांसाठी २०० ते १,५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. आधीच विमान प्रवासाचे वाढते दर आणि त्यात आसनासाठी मोजावे लागणारे अतिरिक्त पैसे असा दुहेरी दंड प्रवाशांना बसत असल्यामुळे प्रवासीही वैतागले आहेत.

ग्राहक पंचायत काय म्हणते...

विमान कंपन्यांतर्फे जागेसाठी जे पैसे घेतले जातात ते तांत्रिकदृष्ट्या आपण योग्य समजले, तरी नैतिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. व्यवसायामध्ये अशा प्रकाराला अनुचित व्यापार प्रथा (अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस) असे म्हटले जाते. विमानात बिझनेस क्लास आणि इकोनॉमी अशा दोन्हींचे प्रवास दर वेगळे आहेत. पण या दोन्ही श्रेणींमध्ये मिळणाऱ्या सुविधांत फरक आहे. त्यामुळे त्यातील दर आकारणीबद्दल दुमत असायचे कारण नाही. पण याच अनुषंगाने विचार करायचा झाला तर इकोनॉमी क्लासमधील जागांची जी विक्री केली जाते, त्याच्या बदल्यात ग्राहकाला विमान कंपनी कोणत्या सुविधा देते ? मधल्या सीटसाठी पैसे नाहीत आणि खिडकी किंवा बाजूच्या सीटसाठी पैसे, यात काय तर्क आहे ? अद्याप तरी या मुद्यावर आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. पण अशी तक्रार आली तर आम्ही त्याची निश्चित दखल घेऊ.- ॲड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत.

टॅग्स :विमान