Join us

का खुपतेय अर्जुनची निवड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:06 AM

‘चला, बापाच्या जोरावर आता मुलगाही कमावणार...’ ‘त्याचं स्वत:च कर्तृत्व काय? जे काय? आहे ते बापामुळेच...’, ‘आता क्रिकेटमध्येही नेपोटिझम आले ...

‘चला, बापाच्या जोरावर आता मुलगाही कमावणार...’ ‘त्याचं स्वत:च कर्तृत्व काय? जे काय? आहे ते बापामुळेच...’, ‘आता क्रिकेटमध्येही नेपोटिझम आले आहे,’ अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. निमित्त आहे ते नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावाचे.

गेल्याच आठवड्यात झालेल्या आयपीएल लिलावामध्ये अनेक खेळाडूंनी कोटीच्या कोटी रुपयांची कमाई केली. मात्र यामध्येही सर्वांत जास्त चर्चा राहिली ती अवघ्या २० लाखांची किमत मिळालेला एका युवा अष्टपैलू खेळाडूची. कारण हा खेळाडू जन्मजात ग्लॅमर घेऊन आला आहे आणि कुठेही गेला तरी तो आकर्षणाचा विषय ठरतो. हा खेळाडू म्हणजेच अर्जुन तेंडुलकर. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा.

२१ वर्षीय अर्जुनला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीमध्ये आपल्या संघात घेतले. मग काय, सोशल मीडियावर लागले नेटिझन्स आपल्या कामाला. या सर्वांनी दस्तुरखुद्द सचिनवर टीका करतानाच नवोदित अर्जुनला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सेलिब्रेटी हे सर्वसामन्यांच्या गळ्यातील ताईत असतात. त्यामुळेच सेलिब्रेटी व्यक्तींचे वैयक्तिक आयुष्य हे वैयक्तिक राहत नाही. सेलिब्रेटी आपल्या दैनंदिनी आयुष्यात काय करतात, त्यांची मुले काय करतात हे लोकांना जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. यामुळेच सध्या अर्जुनची बरीच चर्चा रंगत आहे. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटच्या मैदानावर येणारा अर्जुन काही पहिला ‘स्टार किड’ नाही. सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दिन इतकंच काय, तर ज्याला खरा जंटलमन म्हणून नावाजले जाते त्या राहुल द्रविडचा मुलगा समित यानेही क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले आहे.

आता या प्रत्येक स्टार किडला वडील म्हणून या दिग्गजांनी मदत केली नसणार का? पण केवळ संघात आपला मुलगा असावा यासाठी त्यांच्याकरिता वशिला नक्कीच लावला नसणार, किंबहुना तसा वशिला लागणारही नाही. कारण, जर खरंच असा वशिला लागला असता, तर आज गावसकर यांचा मुलगा रोहन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच गाजला असता. पण असे झाले का? हीच बाब आता सचिनच्या बाबतीत होत आहे. सचिनने केलेला संघर्ष नव्याने सांगण्याची गरज नाही. सचिनचे आयुष्य हे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. प्रत्येक पालकाची इच्छा असते की, जे मी भोगलंय ते माझ्या मुलाला भोगता येऊ नये. ज्या सुख सुविधा मला मिळाल्या नाहीत, ते माझ्या मुलाला मिळावे. अशी सर्वसामान्य इच्छा सचिनचीही असणारच, मग त्यात वावगे काय? अर्थात यासाठी सचिनने मुलासाठी वशिला लावला असा अर्थ होत नाही.

मुळात आज जे कोणी अर्जुनला ट्रोल करत आहेत, त्यांनी आयपीएलची प्रक्रिया कितपत जाणून घेतली आहे, हाच मोठा प्रश्न आहे. शालेय स्तरापासून खेळत असलेल्या अर्जुनने अनेक स्पर्धांमध्ये छाप पाडली. त्याच्यावर क्रिकेटमध्येच यावं, असे कोणते बंधनही नव्हते. पण, घरी असलेल्या खेळाच्या वातावरणामुळे अर्जुनचे क्रिकेट मैदानावर पडलेले पाऊल साहजिकंच आहे. मुळात कोणत्याही सेलिब्रेटीच्या मुलाने कोणत्याही क्षेत्रात कारकिर्द केली, तरी त्याने आपल्या स्टार पालकांच्या जिवावर सर्व केले, असाच ठपका त्यांच्यावर पडला असता. मग यातून, ज्याचे वडील कोट्यवधी भारतीयांसाठी देव आहेत, अशा अर्जुनची तरी कशी सुटका होणार?

आता प्रश्न राहतो अर्जुनच्या खेळण्याचा. अर्जुनची मुंबई इंडियन्समध्ये निवड झाली खरी, मात्र त्याला इतक्यात अंतिम संघात स्थान मिळण्याची तिळमात्र शक्यता नाही. नेटिझन्सच्या म्हणण्याप्रमाणे जर वडिलांच्या शब्दाला मान राखून मुंबई इंडियन्सने त्याला खेळवले, तर संघातून बाहेर कोणाला बसवायचे हाही प्रश्न त्यांच्यापुढे येणार? जर खरंच सचिनने वशिला लावला असेल, तर तो फारतर मुलाला पंचपक्वानांची थाळी समोर आणून देऊ शकतो, पण ते पंचपक्वान खाण्यासाठी अर्जुनलाच स्वत:हून हात पुढे करावे लागणार ना. त्याचप्रमाणे, जरी अर्जुनला अंतिम संघात स्थान मिळाले, तरी त्याची कामगिरी कशी होते यावरही बरेच अवलंबून आहे.

यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून अर्जुनने मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले. युवा खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केल्यानंतरही अर्जुनची विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी निवड झाली नाही. आता इथे सचिनला वशिला लावता आला नाही का? येथे गुणवत्ता आणि अनुभव पाहूनच संघ निवडण्यात आला. त्यामुळेच, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याचे मत योग्य वाटते की, ‘अर्जुनच्या उत्साहाला सुरू होण्याआधीच संपवू नका.’

थोडक्यात काय, तर स्वत:च्या वडिलांच्या जागेवर सरकारी नोकरी मिळवण्याची अपेक्षा राखणारेच आज अर्जुनवर नेपोटिझमचा ठपका लावत आहेत. त्यामुळे लोकांना कितीही समजावले तरी त्यांना सेलिब्रेटींच्या मुलांचे दु:ख, त्यांची कारकिर्द ‘बाउन्सर’च ठरणार.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)