Join us

बिलाची तक्रार कशासाठी? आॅटोमॅटिक मीटर रीडिंगने स्वत:च घ्या अचूक नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 6:11 AM

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या चारही वीज कंपन्यांना यासंदर्भात निर्देश दिले असून, आॅटोमॅटिक मीटर रीडिंगला प्रोत्साहन दिले आहे.

मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांना घाम फोडला आहे. ५ हजारांपासून ११ हजारांपर्यंत आलेल्या बिलांमुळे वीज ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे ग्राहक व कंपन्यांमध्ये वाद होत आहेत. ते टाळण्यासाठी आॅटोमॅटिक मीटर रीडिंगचा पर्याय वीज वितरण कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या चारही वीज कंपन्यांना यासंदर्भात निर्देश दिले असून, आॅटोमॅटिक मीटर रीडिंगला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे स्वत:च मीटरच्या अचूक नोंदी घेणे शक्य होत आहे. कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रीडिंग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. आवाहनानुसार, २ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग पाठविले. त्याप्रमाणे त्यांना वीजवापराचे अचूक मासिक वीजबिल मिळाले.पूर्वीच्या महिन्यांची सरासरी काढून बिले देण्यात येत होती. त्यानंतर मात्र रीडिंगनुसार दिलेली बिले जास्त असल्याचा आरोप ग्राहकांनी केल्याने कंपन्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तक्रार निवारणासाठी आॅटोमॅटिक रीडिंगचा पर्याय कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात आला.

टॅग्स :वीजमहाराष्ट्र