Join us

कोरोना ह्रदयसम्राट गप्प का? दिवसभराच्या गर्दीवरुन मनसेचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 3:40 PM

रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहोचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं.

ठळक मुद्देमनसेचे संदीप देशपांडे यांनी कोरोनाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. 

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. नारायण राणेंच्या विधानावरुन राज्यात गोंधळ सुरू असून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या गर्दीत आंदोलन सुरू आहेत. कोरोनाचे बंधन असतानाही, नियमांना धाब्यावर बसवून राज्यभर आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यावरुन, मनसेनं मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.  

रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहोचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून नारायण राणेंविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. त्यावरुन, मनसेचेसंदीप देशपांडे यांनी कोरोनाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.  महाराष्ट्रात आज सकाळपासून कायदा सुव्यवस्था "फाट्यावर" मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही, गर्दीच गर्दी असून "करोना हृदय सम्राट" गप्प का? आणि हो सोशल डिस्टनसिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. 

राणेंच्या अटकेसाठी पोलीस दाखल

राणेंच्या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटले असून राणेंविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अटक करण्यास निघालेल्या पोलिसांकडे अटक वॉरंट नसल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

अटक वॉरंट दाखवा, आम्ही गाडीत बसू - जठार

केंद्रीयमंत्री असल्याने काही प्रोटोकॉल आवश्य पाळले पाहिजे. आम्हाला अटक वॉरंट दाखवा, राणे पोलिसांच्या गाडीत बसून अटक व्हायला तयार आहेत. पोलिसानं सांगतात आम्हाला दोन मिनिटात अटक करायला सांगितली आहे, अशी माहिती प्रमोद जठार यांनी पुढे दिली. आम्ही कायदेशीररित्या मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेलो आहोत. तसेच राणे यांची तब्येत बिघडली असून त्यांचा बीपी आणि शुगर वाढली आहे. त्यांना डॉक्टर तपासत असल्याची देखील माहिती जठार यांनी दिली.  

टॅग्स :मनसेसंदीप देशपांडेनारायण राणे